Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला ठरवून सापळ्यात अडकवलं'; किरण माने यांनी फेटाळले प्रोडक्शन हाऊसचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:32 IST

Kiran Mane: आज ( ४ फेब्रुवारी) किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अनेक गौप्यस्फोटही केले आहेत.

'मुलगी झाली हो' या मालिकेमधून अभिनेता किरण माने यांना अचानकपणे काढून टाकल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना या मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन नव्या वादाला तोंड फुटलं होतं. याप्रकरणी त्यांनी शरद पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांची भेट घेतली होती. ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. यामध्येच आज ( ४ फेब्रुवारी) किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अनेक गौप्यस्फोटही केले आहेत.

"पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा एकच आहे.मला मालिकेतून काढून टाकण्यापूर्वी कोणतंही कारण, तक्रारी याविषयी कोणताही मेल का आला नाही? किंवा, चॅनेललाही तशी नोटीस किंवा मेल का पाठवला नाही? माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हिंदीमधील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एका मराठी अभिनेत्याला हुकूमशहासारखा आदेश येतो. बेकायदेशीरपणे त्याला काढून टाकलं जातं हे गंभीर आहे, असंविधानिक आहे आणि अन्यायकारक आहे. हे पूर्वापार चालत असेल तर फार भयानक आहे. निदान आता तरी माझ्यानिमित्ताने हे बदलायला हवं. ही माझी इच्छा आहे", असं किरण माने म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "सुरुवातीच्या काळात मला काढून टाकण्यामागे व्यावसायिक कारण असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अत्यंत धक्कादायत आणि नवीन कारण दिलं ते म्हणजे महिलांशी गैरवर्तन. आता महिलांशी गैरवर्तन हे गंभीर स्टेटमेंट आहे.माझ्यावर करण्यात आलेले आरोप धाधांत खोटे, बदनामीकारक आहेत. मला ठरवून,कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे."

किरण माने यांना मिळणार ५ कोटींची नुकसान भरपाई?

किरण माने यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच त्यांच्या वकिलांनीही त्यांची बाजू सर्वांसमोर मांडली. "इतकंच नाही तर सामाजिक स्तरावर किरण माने यांचा जो अपमान झाला आहे त्याप्रकरणी पॅनोरमा आणि त्यांच्याशी संबंधित इतर एजन्सीजला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  किरण माने यांना सामाजिक स्तरावर अपमानित करण्यासोबतच वाळीत टाकण्यात आलं आहे, त्यांची बदनामी झाली आहे आणि स्त्रियांप्रती हा माणूस असंवेदनशील असल्याचं म्हणत त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागला आहे. करिअरच्या बाबतीत त्यांचं जे नुकसान झालं आहे. त्यासाठी पॅनोरमा आणि इतर संबंधित एजन्सीने त्यांना ५ कोटींची नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम्ही पाठवलेल्या नोटीशीमध्ये केली आहे", असं किरण माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.

टॅग्स :किरण मानेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी