Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच मंगळवारी(१९ नोव्हेंबर) भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राजन नाईक हे इतर पदाधिकाऱ्यांसह पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये गोंधळ घातला. विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी आल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरलं होतं. शेवटी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतल्यानंतर विनोद तावडे हॉटेलमधून बाहेर पडले. या संपूर्ण प्रकरणाने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
विनोद तावडेंच्या या प्रकरणावरुन मराठी अभिनेता आस्ताद काळेने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने सणसणीत टोला लगावत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
आस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. अनेकांनी आस्तादच्या या क्रिप्टिक पोस्टवर हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत. तर काहींनी "तावडीतून सुटेल", "निर्दोष सुटका" अशा कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, बविआने पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.