Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:45 IST

आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया. 

राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून मराठी-हिंदी वाद सुरू आहे. यावरुन राजकारणही तापलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांची मतं मांडत मराठी-हिंदी मुद्दा उचलून धरला. अभिनेता आस्ताद काळेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पण, आपल्याच भाषेबद्दल बोलताना मराठी माणसानेच भाषेचं नुकसान केलं असं आस्तादने म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाला आस्ताद, जाणून घेऊया. 

आस्ताद काळे काय म्हणाला? 

"मराठी भाषेचं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर ते आपण मराठी माणसानेच केलं आहे. श्रीरंग गोडबोलेंची एक मुलाखत आहे, ती आवर्जून लोकांनी पाहावी. त्यांनी हा मुद्दा अगदी सुंदर पद्धतीने अधोरेखित करून मांडलाय. सांगणं, म्हणणं आणि बोलणं ही तीन क्रियापदं मराठीमध्ये आहेत. त्या तिन्हीचा उपयोग, वापर आणि अर्थ वेगळा आहे. Tell, Said, Talk हे इंग्रजीमध्ये आपण वापरतो. मराठीमध्ये मी त्याला म्हटलं, मी त्याला बोललो...नाही. मग काय म्हटलं जातं, भावना पोहोचल्या ना... मग भावनाच फक्त पोहोचवायच्या असतील तर मग दीडहजार शब्दांच्या व्होकॅब्लरीवर तुम्ही आयुष्य काढू शकता. म्हणजे तुमचीच भाषा तुम्हीच मारत चालला आहात", अशी प्रतिक्रिया आस्तादने सिनेचित्र एंटरटेनमेंटला दिली.

पुढे तो म्हणाला, "सरकारच्या निर्णयांवरती ताशेरे ओढणं, त्यांना दोष देणं; हा एक भाग झाला. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही मराठीसाठी काय करताय, तुम्ही मराठीसाठी किती जागरूक आणि जागृतपणे हे बोलताय, वाचताय...हल्ली नवीन लिखित पुस्तकांची पहिली आवृत्ती दोनशेची आवृत्तीसुद्धा खपत नाही. मराठी माणूस म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे ह्याविषयी काहीतरी करा आणि मग बोलायला जा. मराठी भाषेचं नुकसान आपण करतोय हे आरशासमोर उभं राहून छातीठोकपणे अमान्य करुन कोणीही दाखवावं, मग माझ्याशी बोलायला यावं".

आस्तादच्या या प्रतिक्रियेनंतर चाहते आणि प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आस्ताद 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :अस्ताद काळेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता