Milind Gawali: मिलिंद गवळी (Milind Gawali) हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आजवर त्यांनी मराठी मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी साकारलेला अनिरुद्ध प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या मालिकेत नकारात्मक भूमिका असली तरी ती रसिकांच्या पसंतीस उतरली. आता लवकरच ते पुन्हा नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. त्यात आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंद गवळींनी टीव्ही इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
नुकतीच मिलिंद गवळी यांनी 'टेली गप्पा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले अनुभव शेअर केले. त्यादरम्यान, अभिनेते म्हणाले, "काही लोकांना खूप संघर्ष करावा लागतो आणि त्यांनी या क्षेत्रात येऊच नये. हे साधं, सरळं आणि सोपा मार्ग नाही आहे. ९ ते ५ करा. तिथे तर ५ वाजायच्या आत लोकं बॅग पॅक करुन निघून जातात. इथे तसं नाही. इथे सीन संपला नाही तर रात्री २,३ ते ४ वाजेपर्यंत काम करावं लागतं. बऱ्याच वेळा असंही झालंय की कॅमेरामॅन म्हणतो, अरे आता सूर्य वरती आला आहे. रात्र गेली आता मी शूट करु शकत नाही. म्हणून शूटिंग थांबवलं जातं, नाहीतर ते शूट चालू राहतं."
यापुढे ते म्हणाले, "बरेच कलाकार तिथे सेटवर बेशुद्ध पडतात. डेली सोप करताना नायिका बेशुद्ध पडतातच. कारण, त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेशर असतं. जर मुख्य अभिनेत्री असेल तर सर्वात जास्त सीन्स, डायलॉग्ज असतात. तु्म्ही जर ते काम नीट केलं नाही तर शंभर टक्के तुम्ही आजारी पडणार. मग आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या आरोग्याच्या समस्या डॉक्टरांना कळतात."
मानसिक आरोग्यसंबंधित समस्या निर्माण होतात...
"गेल्या सात वर्षांपासून मी या क्षेत्रात असल्यामुळे मी मालिकांमध्ये काम करतो आहे. त्यावरुन माझ्या निदर्शनास आलं आहे की, टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना मानसिक आरोग्यसंबंधित समस्या निर्माण होणार. कारण, सातत्याने एक भूमिकेत असता. जे तुम्ही नाही आहात. तुमचा स्वभाव हा त्याच्यापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे हे क्षेत्र फार वेगळं आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.