Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसी नाईकचा मोठा निर्णय, यापुढे करणार नाही रिॲलिटी शो; म्हणाली, 'अभिनेत्रींमध्ये भांडण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:05 IST

Manasi naik:

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगणा मानसी नाईक (manasi naik) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. 'फिल्मी करिअर'पेक्षा गेल्या काही दिवांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच मानसीने एक मुलाखत दिली. या मिलाखतीमध्ये तिने रिॲलिटी शोचं भयानक वास्तव सांगितलं आहे. इतंकच नाही तर तिने हे शो करणं बंद केल्याचंही म्हटलं.

अलिकडेच मानसीने अमृता राव हिच्या 'अमृता फिल्म्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या पुढे रिॲलिटी शो करणार नाही, असं सांगितलं. त्यामागचं कारणही तिने यावेळी सांगितलं. रिॲलिटी शोमध्ये विजेता पूर्वनियोजित असतो का? किंवा कोणत्या प्रकारचा पक्षपात केला जातो का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने थक्क करणारा प्रसंग सांगितला. 

"रिॲलिटी शोमध्ये पक्षपात केला जातो की नाही हे खरंच मला माहित नाहीये. कारण, मी जे रिअॅलिटी शो केले तिथं असं काहीच घडलं नव्हतं. मी प्रत्येक राऊंडमध्ये परफॉर्म केलं होतं. मला हल्लाबोल क्वीन हा खिताबही मिळाला. पण याच्यापुढे मी कोणताही रिअॅलिटी शो करणार नाही. कारण, रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचा ताण सहन करावा लागतो. मी ज्यात सहभागी झाले होते तो छोट्या पडद्यावरचा एकमेव रिॲलिटी शो होता ज्यात २० अभिनेत्री एकाच वेळी सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यांमधून पहिल्या क्रमांकावर येणं, मेहनत, एपिसोडचं शूट या सगळ्याचा ताण येतो खूप. प्रत्येकाला या शोच्या नावाप्रमाणे ‘रिअ‍ॅलिटी’ समजते. आम्ही तेव्हा रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग केलं होतं. जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांचं युनिट तिथे काम करत होतं. साडेतीन महिने तिथे एपिसोड्सचं शूटिंग झाल्यावर आमचा महाअंतिम सोहळा मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरला पार पडला होता",असं मानसी म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "या सगळ्यात अभिनेत्रींमध्ये भांडण, गॉसिप मग हे गाणं हिलाच का मिळालं? वैगरे या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरु व्हायची. आम्ही तीन जणी सोडून इतर सगळ्या अभिनेत्री मला त्यावेळी सिनिअर होत्या. आता मी कोणाचं नाव घेणार नाही. पण, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत. कारण, भले त्या एकमेकींच्या मैत्रिणी होत्या पण स्पर्धा सगळ्यांनाच जिंकायची होती. त्यामुळे ती एक प्रकारची स्पर्धा असते आणि प्रत्येकालाच पुढे जायचं होतं."

दरम्यान, वाट माझी बघतोय रिक्षावाला हे मानसीचं गाणं तुफान लोकप्रिय झालं. या गाण्यामुळेच ती विशेष लोकप्रिय झाली. तसंच आजवर तिचे अनेक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तसंच ती अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही झळकली आहे.

टॅग्स :मानसी नाईकटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी