Ruturaj Phadke : मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी या सरत्या वर्षात आपलं स्वप्न पूर्ण केलं. यंदाच्या वर्षात कोणी ड्रिम कार खरेदी केली तर कोणी स्वत: चं घर घेतलं. मुधुराणी प्रभुलकर, रुपाली भोसले तसेच अमृता खानविलकर ऐश्वर्या नारकर या कलाकारांनी मायानगरी मुंबईत घर घेऊन ते मुंबईकर बनले. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता ऋतुराज फडकेने सुद्धा (Ruturaj Phadke ) त्याचं स्वप्न साकार केलंय. अभिनेत्याने मुंबईत हक्काचं घर घेतलंय. दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडीओ समोर आला आहे.
ऋतुराज फडकेची पत्नी प्रिती फडकेने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला. नुकतीच त्यांच्या नव्या घराची वास्तुशांती झाली. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याची पत्नी उखाणा घेताना दिसतेय. त्यावेळी ती म्हणते, "दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न. अखेर आज तो दिवस आला. स्वतःचं हक्काचं घर घेऊन खूप आनंद झाला. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच असूदे पाठीशी, ऋतुराज रावाचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी! " अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ऋतुराज फडके हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'मन उडू उडू झालं' या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता. शिवाय ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं.