Join us

"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:47 IST

विनोदी कलाकाराच्या साच्यात अडकवलं? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने व्यक्त केली खदखद, म्हणाला...

Nimish Kulkarni: छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांची कायम चर्चा असते. या विनोदी कार्यक्रमातून अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरात पोहोचला. या शोमधील अनेक विनोदी स्किट्समधून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. अभिनेता निमिष कुलकर्णी सध्या 'चला हवा येऊ द्या' मध्ये दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. अशातच निमिष सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. यादरम्यान, त्याने इंडस्ट्रीत काम करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत.

नुकतीच निमिषने 'अल्ट्रा मराठी बझ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला टाईपकास्ट होण्याची भीती असते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अभिनेता म्हणाला, "टाईपकास्ट होण्याची भीती ही माझ्या मते या फॉरमॅटमध्ये जास्त असते. हास्यजत्रेनंतर मी सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम केलं होतं. त्याच्यानंतर मी अगदीच मन सुद्ध तुझं नावाच्या एका सीरिजचा एपिसोड देखील केला आहे. त्यामधील माझं काम हे पूर्णपणे वेगळं होतं."

त्यानंतर पुढे निमिष म्हणाला, "याबाबतीत मला गोस्वामी सराचं एक वाक्य फार आवडतं की एखाद्या शोमध्ये कॉमेडियन्स असतात हा लोकांचा भ्रम आहे, तो काढून टाकला पाहिजे. कॉमेडियन असणं वेगळं आणि अभिनेता असणं वेगळं आहे. हास्यजत्रामधील सगळ्या कलाकारांना इतर माध्यमातही काम करताना बघता. नाटक असो  मालिका असो किंवा चित्रपट त्यामधल्या त्यांनी साकारलेल्या भूमिका वेगळ्या असतात. त्या भूमिका इतक्या चांगल्या होतात कारण, कलाकाराचं काम हे त्याच्याकडे आलेलं काम पूर्णत्वास नेणं येवढंच असतं."

मग तो म्हणाला, "कॉमेडियन हा प्रकारच आपल्याकडे वेगळा आहे. त्यामुळे माझी टाईपकास्ट होण्याची भीती हळूहळू कमी होत गेली. सुरुवातीला वाटलं होतं की प्रेक्षक आपल्याकडे हा असंच काम करतो या नजरेने बघणार नाही ना असं वाटायचं. आपल्याकडे दुर्दैवाने पटकन असं म्हटलं जातं की, अरे! हा तर विनोदी कलाकार, स्किट्स करतो, हा असंच काम करतो. हे तुम्ही एखाद्याच्या बाबतीत ठरवू शकत नाही. याची गरज नाहीए कधीच, आपल्याकडे ऑडिशन नावाची पद्धत आहे ना. मग तुम्ही ऑडिशन का घेता? तुम्ही त्याला त्याच साच्यात का अडकवता? मग तुम्ही ऑडिशनच बंद करून टाका ना. एकतर ऑडिशनला बोलवा आणि त्याला परफॉर्म करायला लावा,  जर त्याने त्या शोमध्ये तसंच काम केलं तर मग तुम्ही तसं म्हणा. या गोष्टींची भीती मनात होती." अशी खदखद अभिनेत्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटी