'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा आणि विनोदी अभिनयाने खळखळवून हसवणारा अभिनेता दत्तात्रय मोरे बाबा झाला आहे. दत्तूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावरून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी पाळणा हलला आहे. त्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
दत्तूने त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना बाबा झाल्याची गोड बातमी दिली आहे. या फोटोंमध्ये त्याने छोट्या दत्तूसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. "फायनली...तो आला! आता ब्लेम करण्यासाठी आमच्याकडे एक हक्काचा छोटा माणूस आहे. या आशीर्वादासाठी नेहमीच कृतज्ञ आहे. छोटा दत्तू मोरेचं स्वागत आहे", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. दत्तूच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं आणि पत्नीचं अभिनंदन केलं आहे.
दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वाती घुनागे हिच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याने स्वातीसोबत गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. दत्तूची पत्नी स्वाती ही पेशाने डॉक्टर आहे. तिचं स्वत:चं क्लिनिकही आहे.