Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची ६ वर्ष! नम्रता संभेरावची भावुक पोस्ट, म्हणते- "जगाच्या कानाकोपऱ्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:42 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे ८५० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अभिनेत्री नम्रता संभेरावने खास पोस्ट शेअर केली आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हास्यजत्रेचे चाहते आहेत. हास्यजत्रेचे विनोदवीर उत्तम अभिनय आणि विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांनाही संधी दिली. गेली ६ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. नुकतंच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे ८५० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने अभिनेत्री नम्रता संभेरावने खास पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता ही मराठी सिनेसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये तिने काम केलं आहे. पण, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. नम्रताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स देत असते. नम्रताने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. 

"महाराष्ट्राची हास्यजत्रा मोठा प्रवास साडे 850 भागांचा ❤️ 6 वर्षे अभिमानाची सुखाची भरभराटीची सोनी मराठी सोबतच्या नात्याची❤️ आणि हा प्रवास प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता, तुमचं अतोनात प्रेम जिव्हाळा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हीच आमच्या कामाची पावती...हास्यजत्रेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलोय खूप भारी वाटतंय❤️ तुमचं आमच्यावरच प्रेम असंच राहू द्या कायम", असं कॅप्शन नम्रताने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, नम्रताने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. एकदा येऊन तर बघा या सिनेमात ती झळकली होती. तर नाच गं घुमा या सिनेमात नम्रता मुख्य भूमिकेत होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारनम्रता आवटे संभेराव