घरोघरी गणरायाचं आगमन झालं असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही दरवर्षी बाप्पा विराजमान होतात. लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिच्या घरीही बाप्पाचं आगमन होतं. यंदा मालिकेमुळे मृण्मयीला दोनदा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळाल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. याबद्दल अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत.
गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेल्या मृण्मयीने सांगितले की, "यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते कि मला दोनदा गणपती बाप्पा अनुभवायला मिळाले. एक आमच्या मालिकेत म्हणजेच जगताप कुटुंबांनी बाप्पाच स्वागत केलं, गणेश आगमनाचा सीन आम्ही गणेशोत्सव सुरू व्हायच्या आधी शूट केला होता आणि गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनपर्यंत सर्व आम्ही मनापासून आणि उत्साहपूर्वक शूट केलं. फक्त गणपतीचं नाही तर आमच्याकडे गौराई ही बसल्या होत्या, त्याआधी हरतालिकेची पूजा मला सर्व पूजा करायला मिळाल्या. या सणाची सुरुवात होण्याआधीच आमच्या सेटवर सुरु झाली होती, आणि लाखात एक आमचा दादा मालिकेमुळे हे इतकं सगळं सुंदरपणे अनुभवायला मिळालं".
"मी माझ्या भूमिकेला 'तुळजा'ला धन्यवाद म्हणेन की तिच्यामुळे मला गणेशोत्सव दोनदा साजरा करायला मिळाला. माझ्या घरी १.५ दिवसाचा गणपती असतो आणि नेहमीप्रमाणे या वर्षी ही १५-२० दिवस आधीपासूनच तयारी सुरू केली होती. आम्ही इकोफ्रेंडली पद्धतींने गणेशोत्सव साजरा करतो. अगदी साधं आणि सुंदर डेकोरेशन केलं होतं. बाप्पाच्या आवडीचे मोदक नेवेद्याला केले, गणपती अथर्वशीर्ष आवर्तन असतं. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी खूपच विशेष आणि भाग्याचं ठरलं", असंही मृण्मयी म्हणाली.