Join us

'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. "

By देवेंद्र जाधव | Updated: July 26, 2025 09:46 IST

चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वाबद्दल कुशल बद्रिकेने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशलने जुन्या सीझनबद्दलही मनातील भावना व्यक्त केल्यात

कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कुशलला आपण विविध सिनेमा, मालिका आणि टेलिव्हिजन शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय. कुशल आजपासून सुरु होणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात झळकणार आहे. या नवीन सीझनमध्ये कुशल पुन्हा नवनवीन कॅरेक्टर्स साकारुन कशी धमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच कुशलने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये कुशल चांगलाच भावुक झाल्याचं दिसतंय.

कुशलची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात त्याने नवीन सीझनचा सेटही दाखवला आहे. कुशल लिहितो की, "नव्याच्या उंबरठ्यावर जुनी काही पानं चाळली गेली, आणि मन भरून आलं. पण माझे बाबा कायम म्हणायचे, माणसाला सोडून देता आलं पाहिजे, धरून ठेवायला आपण काय पिंपळावरचं भूत आहोत ! माणसाने “जुन्याची कास सोडायची आणि नव्याची आस धरायची” ! आज ती वेळ येऊन ठेपलीये . “चला हवा येऊ द्या” नव्याने सुरु होतंय, आता नवीन भिडू नवीन राज्य.. नव्याने चुकायचं, नव्याने शिकायचं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आमच्या सोबत असुद्या plz.. ह्या प्रवासात त्यांची गरज आहे."

'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन

'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन आजपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर बघायला मिळणार आहे. जुन्या पर्वातील निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे आता या नवीन पर्वात नसणार आहेत. या नवीन सीझनमध्ये आता गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे कलाकार झळकणार आहे. डॉ. निलेश साबळेच्या ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. सर्वांना 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वाची उत्सुकता आहे.

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्याश्रेया बुगडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार