अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. दर दिवशी ती आपल्या तब्येतीचे अपडेट्स सोशल मीडियावरुन देत असते. चाहत्यांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. किमोथेरपीच्या त्रासातून जातानाचं दु:खही हिनाने शेअर केलं. तसंच इतर कॅन्सर पीडितांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ती स्वत: सकारात्मक संदेश देत असते. अशातच २०२४ साली गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये हिना खानचं नाव आहे. यासाठी अनेकांनी तिचं अभिनंदन केलं पण हिनाला मात्र याचं वाईट वाटलं आहे.
हिना खानने पोस्ट शेअर करत या प्रसिद्धीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने लिहिले, "सध्या अनेकजण स्टोरी पोस्ट करत माझं अभिनंदन करत आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे काही मला मिळालेलं कोणतं यश नाही आणि ना ही मला याचा गर्व आहे. मी प्रार्थना करते की एखाद्याला तो ज्या आजारातून जात आहे त्यासंदर्भात त्याला गुगलवर सर्च करु नये. माझ्या या कठीण प्रसंगी लोक माझा आदर आणि सम्मान करतात यासाठी मी त्यांची ऋणीच आहे. पण माझ्या कामासंदर्भातील किंवा एखाद्या यशासंदर्भातील गोष्टींसाठी मला गुगलवर सर्च केलं गेलं किंवा माझी दखल घेतली गेली तर मला आनंद होईल. अगदी तसंच जसं मला कॅन्सरच्या होण्याच्या आधी किंवा झाला असताना घडत होतं."
हिना खानला जून महिन्यात स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. तेव्हापासून ती सकारात्मक पद्धतीने या आजाराला सामोरी जात आहे. कधी खचली तरी नव्याने उभी राहत आहे. आपल्या हा प्रवास ती चाहत्यांसोबत जमेल तसा शेअर करत असते. नुकतीच तिने बिग बॉस १८ च्या मंचावरही स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. तर त्याच्या काही दिवस आधी तिने एका इव्हेंटवेळी रॅम्प वॉकही केला.