फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचला. ५ वर्ष हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्याने एक्झिट घेतली होती. आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने गौरवने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हास्यजत्रेतील त्याच्या मित्रांबद्दल भाष्य केलं.
गौरवआधी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेनेही एक्झिट घेतली होती. गौरव म्हणाला, "ओंकार अजूनही माझ्या कॉन्टॅकमध्ये आहे. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आम्ही फोन करतो. आमचं बॉण्डिंग खूप चांगलंय आणि आम्ही एकत्र खूप काम केलंय. तो गेल्यानंतर मी एकटा पडलो. तो माझा चांगला मित्र आणि एक उत्तम अभिनेता आहे. पण जसं मी पाच वर्षांनी हास्यजत्रा सोडली तसंच त्याचं पण काहीतरी कारण असेल. तो सध्या सिनेमा, नाटकांत काम करतोय. कधी कधी आम्ही भेटतोदेखील...".
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरवसोबत शोमध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि कुशल बद्रिके 'चला हवा येऊ द्या'मध्ये परिक्षक असतील.