प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी' विजेता तसेच 'लाफ्टर शेफ सीझन 2'चा विजेता एल्विश यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अशातच तो त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. एल्विश हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
एल्विश यादवने यापूर्वीच खुलासा केला होता की तो एका मुलीला डेट करत आहे. पण तिचे नाव कधीच सांगितले नव्हते. मात्र, नुकतंच त्याने इंस्टाग्रामवर लोकप्रिय अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, त्यानंतर दोघांच्याही डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या फोटोंमध्ये एल्विश पांढऱ्या कुर्त्यात दिसत आहे. तर जन्नतने लाल रंगाची साडी नेसली आहे. "तेरे दिल पे हक मेरा है" असे कॅप्शन एल्विशने या फोटोंना दिले आहे.
हे फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर अनेक चाहत्यांनी जन्नतला 'भाभी' (वहिनी) म्हणायला सुरुवात केली, तर काहींनी दोघांनाही लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, काही लोक असा अंदाज लावताना दिसले की हे फोटो त्यांच्या आगामी गाण्याचे किंवा प्रोजेक्टचे असू शकतात. हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो, असेही अनेकांचे म्हणणे आहे. तसेही, याआधीही एल्विशचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते.
जन्नत जुबैरबद्दल बोलायचं झालं तर तिने फार कमी वयात मोठं नाव कमावलं आहे. तिनं बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानला इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकलेलं आहे. शाहरुख खानच्या ४८.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर जन्नतचे ५०.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्थातच जन्नत २ मिलियन फॉलोअर्सनं शाहरुखच्या पुढे आहे. जन्नत फक्त अभिनयचं करत नाही तर बिझनेसवूमन देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती २५० कोटींची आहे. यामुळे ती कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.