सध्या सोशल मीडियावर हे माध्यम झपाट्याने वाढलं आहे. अनेक तरुण नोकरी धंदा सोडून सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी झगडत आहेत. या माध्यमात चांगला कंटेंटही आहे पण तितकाच वाईट आणि अश्लील कंटेंटही पाहायला मिळत आहे. या अश्लील कंटेंटलाही लोक दाद देत आहे, ते पाहत आहे. ही नीच, वाईट, घाणेरडी प्रवृत्ती होत चालली आहे आणि येणाऱ्या पिढीचं यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं असा इशारा 'बिग बॉस' फेम इन्फ्लुएन्सर कोल्हापुरचा डीपी म्हणजे धनंजय पोवारने (Dhananjay Powar)दिला आहे.
धनंजय पोवारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत मोठा संदेश दिला आहे. तरुणांना आणि लोकांना त्याने जागं केलं आहे. तो म्हणतो, "सोशल मीडियावर काय चाललंय? राख रांगोळी, वाटोळं व्हायला लागलंय. प्रत्येक मुला मुलीला व्हायरल व्हायचंय, लाईक्स फॉलोअर्स वाढवायचेत. त्यासाठी स्वत:चे उघडे नागडे फोटो, निगेटिव्ह काहीतरी करायचं आणि मग ते रिकव्हर करायचं ही एक स्ट्रॅटेजी झाली आहे. माझा इतका राग का होतोय यामागे एक कारण आहे. अशा लोकांना आपण सोशल मीडियावर थारा दिलाय. आज नेपाळसारख्या देशाने सोशल मीडिया बॅन करण्यासारखा मोठा निर्णय घेतला त्यावर एवढं झालं. बरं ही बातमी सोशल मीडियावरच व्हायरल झालीये. मी अश्लील काहीही दाखवून व्हायरल होतोय हे जर कोणाला माहित असेल तर त्यांनी ते का करु नये अशी स्थिती झाली आहे. चार लोक काय म्हणतील असं आपण जे बोलतो त्या चार लोकांनी इथे जागं होणं गरजेचं आहे."
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही धनंजयने भावना व्यक्त केल्या आहेत . तो लिहितो, "खूप खूप वाईट वाटते आज सध्या प्रकारचे लोक आपल्या टोटल मानसिकतेवर काळिमा फासणारे लोक झालेत. स्वतः किती आणि कसे मोठे होतील हे पाहताहेत पाहुदे ना काहीच प्रॉब्लम नाही पण वाईट पद्धतीनेच का मोठे व्हायचे तुम्हांला? सोशल मीडिया वरून अशोक दर्शन आणि अश्लील भाषा काय देणारे आपण येणाऱ्या पिढीला? पैसा कमवायचय म्हणुन इतरांचे पण चांगले व्हायला पाहिजे ना? का तुम्हाला पैसा चुकीच्या माध्यमातूनच कमवायचा आहे. येणारी पिढी मला तर वाटतय काम करायचं सोडुनच देईल. त्यामुळे भीक मागायला पुढच्या पिढीने तयार रहा."
धनंजयच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सहमती दर्शवली आहे. 'अगदी खरं बोललास भावा', 'खूप छान डीपी दादा', 'तू इन्स्टाग्रामवर इतक्या चांगल्या प्रकारे समजून सांगितलंस त्यासाठी धन्यवाद दादा' अशा कमेंट्स आल्या आहेत.