कोल्हापूरचा धनंजय पोवार (Dhananjay Powar) ज्याला सगळे डीपी दादा म्हणूनच ओळखतात. युट्यूब आणि इन्स्टा व्हिडिओंमधून डीपी दादा घरोघरी पोहोचले. नंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात त्याने एन्ट्री घेतली. तिथेही धनंजयने सर्वांचं मन जिंकलं. कायम हसतमुख आणि इतरांनाही हसवणारा डीपी आता हिंदी सिनेमात झळकणार आहे. त्याच्यासोबत बिग बॉस मधला त्याचा मित्र वैभव चव्हाणही आहे.
धनंजय पोवारने युट्यूबवर व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये तो आणि वैभव धमाल करत आहेत. नंतर दोघंही कोकणात शूटिंगला गेलेले दिसत आहेत. शूटिंग सेटवरचीही धमाल मस्ती डीपीने दाखवली आहे. सहकलाकारांसोबत आणि सिनेमाच्या टीमसोबत तो धमाल करतोय. सिनेमाचं नाव kaalkarmma असं आहे. यासोबत धनंजयने कॅप्शनमध्ये लिहिले, "एका नवीन भूमिकेमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे. काही दिवसात एक मूव्ही येतोय जो अमेझॉनवर आहे. यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत. तसेच मकरंद देशपांडे सर आणि माझा जिवलग वैभव सुद्धा आहे. या सगळ्या दरम्यान घडलेले छोटे मोठे किस्से, शूट, दंगा मस्ती तुम्ही पण अनुभवा."
डीपी सिनेमात साधूच्या वेशात दिसतोय. हा लूक करतानाच मेकअप व्हिडिओही त्याने चाहत्यांना दाखवला आहे. डीपीच्या नवीन भूमिकेसाठी सगळेच उत्सुक आहेत. तसंच त्याला सर्वांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणही 'झापूक झुपूक' सिनेमातून भेटीला येणार आहे. सूरजचा चाहतावर्ग पाहता सिनेमा हिट होणार अशीच खात्री व्यक्त केली जात आहे.