टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सध्या मोठ्या चर्चेत आहे. कारण तिच्या सात महिन्यांच्या मुलाच्या त्वचेच्या रंगावरून सोशल मीडियावर काही लोकांनी टीका केली. यामध्ये काहींनी अतिशय अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पणी करत तिच्या मुलावर जहरी टीका केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या देवोलीनाने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे यापुढे तिच्या मुलावर जे कोणी टीका करतील, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागेल, असा इशारा तिने दिलाय.
देवोलिनाची संतप्त प्रतिक्रिया
अवघ्या ७ महिन्यांच्या मुलाला वारंवार रंगावरुन लोक नाव ठेवत असल्याचं देवोलिनाला दिसलं. त्यामुळे देवोलीनाने तिच्या इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया दिली. तिने काही ट्रोलर्सचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांना “फालतू लोक” असं म्हटलं. तिच्या मते, सेलिब्रिटी म्हणून तिच्यावर टीका होणं तिला मान्य आहे, पण एका निष्पाप लहान बाळावर टीका करणं अमानवी कृत्य आहे. “जेव्हा गोष्ट माझ्या बाळापर्यंत पोहोचते, तेव्हा मी शांत राहू शकत नाही,” असं ती म्हणाली. याशिवाय यापुढे अशी कोणी टीका केली, तर त्यांना सोडणार नाही, असंही तिने म्हटलं.
देवोलीनाच्या म्हणण्यानुसार, या ट्रोलर्समध्ये काही जण इंजिनिअर, डॉक्टर किंवा स्वतः आई-बापही आहेत. पण त्यांचे विचार मात्र अत्यंत खालच्या पातळीचे आहेत. तिने सोशल मीडियावर लिहिलं की, “मी केवळ माझ्या मुलाला वाचवण्यासाठी नाही, तर समाजातील वर्णद्वेषाविरुद्ध लढण्यासाठी उभी आहे.” तिने याप्रकरणी दिल्ली सायबर क्राइमकडे तक्रार दाखल केली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी तिच्या या निर्णयाचे समर्थन केले असून, ट्रोलिंगविरोधात आवाज उठवल्याबद्दल तिचं कौतुक केलं जात आहे. देवोलीनाने स्पष्टपणे सांगितले की, "प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असतो आणि तिची ही कृती देखील त्याचाच भाग आहे."