Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही कमबॅक करतोय", CID फेम अभिजीत आणि दया पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:49 IST

CID फेम इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनीच एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे.

टीव्हीवरील सर्वाधिक गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या शोपैकी एक म्हणजे CID. कुछ तो गडबड है म्हणत एसीपी प्रद्युमन अनेक केसेस सोडवायचे. तब्बल ३ दशके प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या शोने निरोप घेतला. टीआरपीच्या रेसमध्ये नेहमी अव्वल स्थानी असलेल्या CID मधूनच इन्स्पेक्टर दया, सिनिअर इन्स्पेक्टर अभिजीत, एसीपी प्रद्युमन, डॉक्टर साळुंके या पात्रांना घराघरात पोहोचवलं. आता इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, CID फेम दया आणि अभिजीत कमबॅक करणार आहेत. एका दणक्यात दरवाजा तोडणारा दया ही भूमिका साकारून अभिनेता दयानंद शेट्टी घराघरात पोहोचला. तर मिस्ट्री सोडवणारा इन्स्पेक्टर अभिजीत अभिनेता आदित्य श्रीवास्तवने साकारला. आता पुन्हा दया आणि अभिजीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण, दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव दया आणि अभिजीत म्हणून नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. 

"आम्ही कमबॅक करत आहोत. पण, अभिजीत आणि दया म्हणून नाही. दया आणि मी २० वर्ष  एकत्र काम केलं आहे. CID टीम ट्रॅव्हल शोची कल्पना घेऊन आली आहे. आम्ही मे महिन्यात युट्यूबवर हा शो लाँच करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्ही महाराष्ट्र, गोव्याची सफर घडवणार आहोत," असं आदित्य श्रीवास्तवने सांगितलं. 

आदित्य आणि दया एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. "आम्ही नुकतंच एका सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आम्हाला आतापर्यंत प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. पुढेही मिळेल ही अपेक्षा आहे," असंही पुढे आदित्यने सांगितलं. 

टॅग्स :सीआयडीटिव्ही कलाकार