Dhananjay Powar : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. या पर्वातील प्रत्येक सदस्याने आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यातील एक नाव म्हणजे धनंजय पोवार (Dhananjay Powar) . आपल्या विनोदी शैलीने कोल्हापूरचा हा पठ्ठ्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. धनंजय पोवार सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असल्याचा पाहायला मिळतो. तो कायम आपल्या आई-वडिलांचे किंवा पत्नीसोबतचे मजेशीर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच त्याने आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुंदर शब्दांत पोस्ट लिहून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
धनंजय पोवारने सोशल मीडियावर त्याच्या आई आणि बाबांचे सुंदर फोटो पोस्ट करुन त्याला अनोखं कॅप्शन देखील दिलं आहे. धनंजयने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, "आज आई आणि पप्पा यांच्या लग्नाचा वाढदिवस खूप खुश रहा तुम्ही दोघे..., आणि तुम्ही खुश राहावे यासाठी मी कोणत्याही गोष्ठीसाठी तयार आहे याची पूर्ण कल्पना तुम्ही ठेवा. जगात कोणीही नसते आई वडिलांच्या समोर प्रत्येक मुलांनी आई आणि वडील यांना प्रथम प्राधान्य दिले जगात वृद्धाश्रम दिसणार नाहीत." धनंजयने अगदी मोजक्या शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत वास्तवाची जाणीव करुन दिली आहे.
दरम्यान, धनंजय पोवारच्या पोस्टवर चाहते मंडळींनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच त्याच्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 'बिग बॉस'च्या घरात कोल्हापूरी अंदाजाने धनंजय पोवारने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला होता. धनंजय हा प्रसिद्ध रीलस्टार आहे. धनंजय पवार विवाहीत असून त्यांच्या पत्नीचं नाव कल्याणी पवार असे आहे. धनंजय व कल्याणीला दोन गोड मुलं आहेत.