Join us

"शाहीर साबळेंचा नातू नसतो तर मी पण...", सूरज चव्हाणच्या ट्रोलिंगवर केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:03 IST

सूरज बिग बॉस गाजवत असला तरी सुरुवातीला मात्रा त्याच्या एन्ट्रीमुळे या शोला ट्रोल केलं होतं. याबाबत आता पहिल्यांदाच केदार शिंदेंनी भाष्य केलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये अनेक सरप्रायजेस मिळाले. होस्टपासून ते घरातील स्पर्धकांपर्यंत या सीझनमध्ये चाहत्यांना आश्चर्याचे धक्के मिळाले. रीलस्टार सूरज चव्हाणने गोलीगत धोका म्हणत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सध्या सूरज बिग बॉस गाजवत असला तरी सुरुवातीला मात्रा त्याच्या एन्ट्रीमुळे या शोला ट्रोल केलं होतं. याबाबत आता पहिल्यांदाच केदार शिंदेंनी भाष्य केलं आहे.

कलर्स मराठी वाहिनीचे हेड केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅच अप या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी सूरजच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर भाष्य केलं. ते म्हणाले, "सूरजची एन्ट्री झाल्यानंतर तुम्ही काय चिप लेव्हला बिग बॉस घेऊन जात आहात. कोणालाही आणताय...अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या होत्या. सूरजमधली माणुसकी आम्हाला दिसली होती. आणि ती माणुसकी लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आमचं काम आहे. जेव्हा पहिल्यांदा सूरजचं नाव आलं तेव्हा आमच्या टीममधल्याही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा माणूस घरात कसं काय करेल? असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं. कारण तो पू्र्णपणे वेगळा माणूस आहे". 

"तुम्ही जेव्हा १०० दिवस एखाद्याला आत टाकता. तेव्हा तो कसं रिअॅक्ट करेल. त्याला हे जमेल का? या सगळ्या सवयी त्याला माहीत आहेत का? या सगळ्याचा विचार करणं महत्त्वाचं होतं. पण, मी कन्फर्म होतो. कारण, बिग बॉस हा कोणत्याही कॅटेगरीचा गेम नसून तो माणसांच्या भावभावनांचा खेळ आहे. ही माणसं कुठून यावीत याला बंधनं नसावीत. सूरजा बिग बॉस माहीत होतं की नाही हे मला माहीत नाही. पण, त्याला भेटल्यानंतर मला त्याच्यातील सच्चेपणा जाणवला. आपल्याला पण कोणीतरी संधी देण्याचा विचार केलाच असेल. आज तो लोकांचा आवडता आहे. सूरजबरोबरची भेट माझ्या लक्षात राहिली. कदाचित मी पूर्वी त्याच्यासारखा असेन. थोडासा पॉलिश असेन, कारण मी शाहीर साबळेंचा नातू आहे. पण, मी जर पॉलिश नसतो तर मी सूरज असतो", असंही केदार शिंदे म्हणाले. 

सध्या सूरज बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे. बिग बॉसच्या झापुक झुपूक एन्ट्री घेणारा सूरज सगळ्यांनाच पुरून उरत आहे. गोलीगत धोका म्हणत तो टास्कमध्ये सदस्यांच्या बुक्कीत टेंगूळ देत सगळ्यांनाच गार करतो. त्याला चाहत्यांचाही फूल सपोर्ट असल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारकेदार शिंदे