Join us

"आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?", मराठी अभिनेत्रीचा थेट बिग बॉसला सवाल, म्हणते- "जान्हवीला तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:14 IST

Bigg Boss Marathi 5 : पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना थेट नॉमिनेट केलं होतं. सर्वच सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असल्यामुळे यंदाच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार असा मोठा प्रश्न सदस्य आणि  प्रेक्षकांनाही पडला होता. रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडी घराबाहेर गेल्याने प्रेक्षकांमध्ये मात्र नाराजी आहे. 

पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. सोनालीने या व्हिडिओतून पॅडीच्या एलिमिनेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. "आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?" असा थेट सवाल सोनालीने बिग बॉसला विचारला आहे. सोनाली म्हणते, "मी नुकतंच बिग बॉस बघितलं आणि बंद केलं. पॅडीदादाचं एकच वाक्य ऐकलं. मी नॉमिनी न करता सूरजचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलं आहे. बिग बॉसच्या घरात त्याची माणुसकी वेळोवेळी दिसली आहे". 

"मला लोकांना आणि बिग बॉसला विचारायचं आहे. कुठे सगळ्या गोष्टी गंडत्यात हे कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतेय आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते का? मिड एव्हिक्शन कोणाचंही होऊ दे. पण, आता पॅडी दादाने जायला हवं होतं, हे बरोबर आहे का? ते देखील जान्हवीच्या आधी...लोक जान्हवीला खरंच अजून पण घरात ठेवू इच्छितात का? पॅडीदादा आधी आणि त्यानंतर जान्हवी घरातून बाहेर जायला पाहिजे, एवढी तिची पात्रता आहे का? काय चाललंय नेमकं? बिग बॉस तिला पाठीशी घालतंय का? बिग बॉसची तिची चांगली इमेज तयार करतंय का? निक्कीसारखं वागून मी चांगली दिसेन असं वाटलं होतं, असं म्हणणाऱ्या जान्हवीचा खरा चेहरा अजून समोर आलेलाच नाही. बिग बॉस बघायचं की नाही?", असंही सोनाली पुढे म्हणत आहे. 

दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार