Join us

'अखेर कोरोनाने मला गाठलचं'; Bigg Boss Marathi 3 फेम 'या' सदस्याला कोविडची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 14:23 IST

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी ३'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लगेचच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच काळात त्यांना कोरोनाने गाठलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या असाध्य विषाणूसोबत लढा देत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामध्येच आता 'बिग बॉस मराठी 3'  (Bigg Boss Marathi 3 ) मधील एका सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सदस्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

उत्तम टास्क खेळण्यासोबतच आपलं मत ठामपणे मांडणाऱ्या तृप्ती देसाई ( trupti desai) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी ३'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लगेचच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच काळात त्यांना कोरोनाने गाठलं आहे. याविषय़ी त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

"अखेर "कोरोनाने" मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी. परंतु, नियमांचे पालन मी करीत होते....जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा", अशी पोस्ट तृप्ती देसाईंनी शेअर केली आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांना कोविडची लागण झाल्यानंतरही त्यांनी इतरांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच त्या सध्या इतरांपासून दूर स्वत:ची काळजी घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाईंच्या नावाचा एक दबदबा तयार झाला होता. आपलं मत ठामपणे मांडणाऱ्या तृप्ती देसाई यांनी घरातील प्रत्येक सदस्याची आईप्रमाणे काळजी घेतली. त्यामुळे त्या संपूर्ण सीझन चर्चेत राहिल्या. 

टॅग्स :तृप्ती देसाईकोरोना वायरस बातम्यासेलिब्रिटीबिग बॉस मराठीटेलिव्हिजन