मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात झाला असून त्याच्या हाताची नस कापली गेली आहे. हा अभिनेता म्हणजे विशाल पांडे. 'बिग बॉस ओटीटी ३' फेम विशाल पांडेसोबत शूटिंगदरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातात त्याची नस कापली गेली असून, पॅरालिसिस होण्यापासून तो थोडक्यात बचावला आहे. विशालने स्वतः सोशल मीडियावर रुग्णालयातून फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे, ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.विशाल पांडेचा मोठा अपघात
विशालने रुग्णालयातून फोटो पोस्ट करुन आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, 'शूटिंग करताना चुकून एक काच हाताला लागली आणि माझी नस कापली गेली. माझ्यासोबत असं काही होईल, याचा मी कधीच विचार केला नव्हता.' या घटनेनंतर विशालचे तातडीने दोन ऑपरेशन्स करण्यात आले. या अपघातानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितले की, 'तुझ्या हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी काही इंचाच्या अंतरावर वाचली. जर ती कापली गेली असती, तर तुझ्या शरीराचा अर्धा भाग पॅरालाईज झाला असता. हा देवाचा आशीर्वाद आहे', असं विशालला डॉक्टरांनी सांगितलं.
या मोठ्या संकटातून बचावल्यानंतरही विशालने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. ''या परिस्थितीमध्येही तुम्ही मला हसताना पाहाल. कारण एकदा मी पूर्णपणे बरा झालो की, मला कोणीही थांबवू शकणार नाही. हा छोटासा अडथळा माझ्यासाठी ऊर्जा ठरेल,'' असंही विशालने सांगितलं. विशालने ही पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून तो लवकरात लवकर बरा व्हावा, म्हणून प्रार्थना केली आहे. विशाल पांडे 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये सहभागी झाला होता. उत्कृष्ट खेळाने आणि उत्तम स्वभावाने विशालने सर्वांचं मन जिंकलं.