Salman Khan Angry on Pranit More:सलमान खान सध्या 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करत आहे. सलमान पुन्हा एकदा त्याच्या खास स्वॅगमध्ये 'बिग बॉस १९'च्या सूत्रसंचालनाच्या धुरा सांभाळत आहे. अशातच 'बिग बॉस १९' सुरु झाल्यावर सलमानने पहिल्याच आठवड्यात वीकेंड का वारमध्ये सर्व स्पर्धकांची शाळा घेतली. यावेळी मराठमोळा स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेला सलमानने चांगलंच झापलं आहे. याविषयीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जाणून घ्या.
सलमानने प्रणित मोरेला सुनावलं
मराठमोळा स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेने त्याच्या स्टँड अप कॉमेडी व्हिडीओमध्ये सलमान खानची अनेकदा खिल्ली उडवली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. आता 'बिग बॉस १९'मध्ये सलमानने याचविषयी प्रणित मोरेची चांगलीच शाळा घेतली आहे.
सलमान म्हणाला, ''तुम्ही माझ्याविषयी जे काही बोलला आहात ते योग्य नाहीये. तुम्ही जे जोक्स माझ्यावर मारले आहेत. जर आता मी तुमच्या जागी असलो असतो आणि तुम्ही माझ्या जागी, तर तुमची प्रतिक्रिया यावर काय असती? पण तुम्हाला माझं नाव वापरुन लोकांना हसवायचं होतं, जे तुम्ही केलंत. तुम्ही विनोदाची अशी पातळू ओलांडू नये, हीच मला आशा आहे.''
अशा शब्दात सलमानने प्रणितला चांगलंच झापलं. सलमान सुनावत असताना प्रणित शांतपणे ऐकत होता. पण काहीसा हसतही होता. एकूणच पहिल्याच वीकेंड का वारमध्ये प्रणितला सलमानकडून इशारा मिळाला आहे. प्रणितने त्याच्या आधीच्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये सलमानची अनेकदा खिल्ली उडवली आहे. ''सलमान पैसे खातच नाही, तो लोकांचं करिअर खातो''. एका क्लिपमध्ये प्रणित म्हणतो की, ''रोहित शेट्टीने सलमानला सांगितलं की, सिनेमात गाडी चालवायला मिळेल. आणि गाडी कशीही चालवू शकतो. हे ऐकताच सलमानने कुठे सही करायचीय?'' असं विचारलं. प्रणित मोरेने केलेल्या याच मस्करीबद्दल सलमानने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.