‘बिग बॉस १९’ चा नवा सीझन आजपासून (रविवार) सुरू होत आहे. त्याआधी कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यात दोन अभिनेत्री स्टेजवर नाचताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘देसी छोरी और विदेशी गोरी’ असे लिहिले आहे. त्यामुळे या दोघी कोण आहेत, असा प्रश्न सर्वांच्या मनात पडला आहे. एकूणच यानिमित्त ‘बिग बॉस १९’मध्ये दोन अप्सरांची एन्ट्री होणार आहे. जाणून घ्या
कोण आहेत त्या दोघी?
कलर्स टीव्हीने हा नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोत दोघींचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, कमेंट्समध्ये यूजर्सने मात्र दोघींना ओळखलं आहे. दोघींपैकी एक भोजपुरी अभिनेत्री आहे तर दुसरी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. भोजपुरी अभिनेत्रीचं नाव आहे नीलम गिरी. तर विदेशी अभिनेत्रीचं नाव अभिनेत्री नतालिया (Natalia Janoszek) असल्याचं सांगण्यात येत आहे. आता या दोघी खरंच ‘बिग बॉस १९’मध्ये एन्ट्री घेणार का, हे आज रात्री ग्रँड प्रीमिअर पाहूनच स्पष्ट होईल.
व्हिडीओत दिसणारी एक अभिनेत्री नीलम गिरी आहे. तिचा जन्म १९९७ साली भूतानमध्ये झाला असून, ती मूळची उत्तर प्रदेशमधील बलिया येथील आहे. तिने आपले शिक्षण पाटणामध्ये पूर्ण केले आहे. ‘बाबुल’ या चित्रपटातून तिने २०२१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर नतालिया एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि लेखिका आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. नीलम आणि नतालिया खरोखरच ‘बिग बॉस १९’ मध्ये दिसणार की नाही, हे आज शो सुरू झाल्यावरच स्पष्ट होईल. पण यानिमित्ताने प्रेक्षकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.