Join us

TMKOC: पलक सिंधवानीच्या आरोपांवर असित मोदींचं उत्तर, म्हणाले, "ती तर मला मुलीसारखी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:15 IST

काही दिवसांपूर्वीच सोनूच्या भूमिकेतील पलकने मालिका सोडली

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेत्री पलक सिंधवानीने (Palak Sindhwani) काही दिवसांपूर्वीच शोला रामराम केला. तिने मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. शो सोडण्यापूर्वी पलकने निर्मात्यांवर काही आरोपही लावले होते. मालिका सुरु असताना इतर जाहिराती करुन शकत नाही अशा काही गोष्टी कॉन्ट्रॅक्ट मध्ये असताना तिने जाहिराती केल्या यावरुन तिला मेकर्सने नोटीस पाठवली. मात्र हे चुकीचं असल्याचं म्हणत तिला सेटवर खूप मानसिक त्रास झाल्याचा आरोप तिने केला होता. आता या आरोपांवर निर्माते असित मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले, "मी पलकला माझी मुलगीच समजायचो. मला खरंच मनातून खूप वाईट वाटलं होतं. सेटवरुन कोणीही कलाकार शो सोडून जातो तेव्हा वाईटच वाटतं. आम्ही एक परिवार आहोत. मी या सगळ्या चर्चांवर जास्त बोलत नाही कारण मी एक कॉमेडी शोचा निर्माता आहे ज्याचा उद्देशच लोकांना हसवणं आहे." यासोबतच असित मोदींनी काही कलाकारांचे पैसे थकवल्याच्या आरोपांचं सुद्धा खंडन केलं आहे.  

गेल्या काही महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोबाबतीत अनेक खुलासे होत आहेत. पडद्यामागे कलाकार निर्मात्यांवर अनेक आरोप लावत आहेत. आधी शैलेश लोढा, त्यानंतर जेनिफर मिस्त्री आणि आणखी काही कलाकारांनी सेटवर मानसिक त्रास दिल्याचा आरोप लावला. जेनिफर मिस्त्री जिने मिसेस सोढीची भूमिका साकारली तिने तर लैंगिक शोषणाचाही आरोप लावला होता. तरी गेल्या १४ वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही कलाकार मालिका सोडून गेले आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन