Join us

निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:48 IST

रंगमंचावर प्रयोग सुरु असतानात निवेदिता सराफ यांना... नक्की काय घडलं?

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि रंगभूमी हे नातं फार जुनं आहे. नाटक हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. विनोदी भूमिकांमुळे ते ओळखले जात असले तरी काम करताना ते अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय आहेत. प्रयोग सुरु असताना रंगमचावर त्यांनी कायम नियमांचं पालन केलं. तसंच रंगभूमीवर कोणाकडून काही चूक झाली तर त्यांना ते सहन होत नाही आणि त्यांना प्रचंड राग येतो. याचाच प्रत्यय खुद्द त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनाच आला होता. 

चुकीला माफी नाही हा डायलॉग अरुण गवळींचा असला तरी अशोक सराफ यांनी प्रत्यक्षात रंगभूमीवर या डायलॉगचं पालन केलं आहे. स्टेजवर उशिरा एन्ट्री घेणं आणि हसणं या दोन्ही गोष्टी त्यांना अजिबात मान्य नाहीत. मात्र नेमकी हीच चूक निवेदिता सराफ यांच्याकडून घडली होती. 'श्रीमंत'या नाटकात काम करत असताना दिग्दर्शक विजय केंकरे यांनी स्क्रीप्टमध्ये बदल करत निवेदिता सराफ यांची एक एन्ट्री काढून टाकली होती. मात्र हा बदल केल्यानंतर एक दोन वेळाच नाटकाची तालीम झाली. प्रत्यक्षात प्रयोगावेळी निवेदिता यांनी चुकून ती एन्ट्री घेतली. त्यांच्यासोबत सुधीर जोशी आणि संजय मोने होते. निवेदिता यांच्या एन्ट्रीमुळे तेही गोंधळले. मग सुधीर मोठ्याने 'आता तुला यायचं नाहीये' असं म्हणाले. निवेदिता यांना तेव्हा स्टेजवरच थोडं हसायला आलं. नेमके त्याच प्रयोगाला समोर अशोक सराफही बसले होते. निवेदिता यांना हसताना पाहून ते चांगलेच रागावले.

'स्टेजवर हसायचं असेल तर काम बंद करायचं आणि घरी बसायचं. हसू आवरता येत नसेल तर काम करु नका' अशा शब्दात त्यांनी निवेदिता यांना सुनावलं होतं. हा किस्सा अशोक सराफ यांनी आपल्या आत्मचरित्रातच सांगितला आहे. 

त्या घटनेनंतर मात्र निवेदिता यांना कधीही हसू आलं तर त्या हा प्रसंग आठवतात आणि त्यांचं हसू थांबतं. अशोक सराफ यांनीही कायम त्यांच्या या नियमाचं पालन केलं आहे.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफमराठी अभिनेतानाटक