भारत-पाकिस्तान देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटी या कठीण प्रसंगी भारतीय सेनेच्या बाजूने आहेत. सामान्य नागरीकही भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करत आहेत. अशातच बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेला अन् सध्या पाकिस्तानात राहणारा अभिनेता फवाद खानने (fawad khan) या हल्ल्याचा निषेध करत भारतावर टीका केली होती. त्यामुळे 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने (rupali ganguly) फवादला चांगलंच सुनावलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींकडे खास मागणी केली आहे.
रुपाली फवादविषयी काय म्हणाली?
रुपाली गांगुलीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फवाद खानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला लज्जास्पद म्हणत टीका केली होती. यावर रुपालीने लिहिलंय की, "तू भारतीय सिनेमांमध्ये काम केलंस याची आम्हालाच लाज वाटतेय." अशा शब्दात रुपालीने फवादला चांगलंच सुनावलं. याशिवाय रुपालीने पंतप्रधान मोदींना टॅग करुन खास पोस्ट केलेली दिसली.
रुपालीने पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलंय की, ""आता खूप झालं मोदीजी! यांना समूळ नायनाट करा." याशिवाय आणखी एक ट्विट करुन रुपाली म्हणाली, "पाकिस्तानी स्ट्रीमींग कंटेंटवर बंदी घालण्याबद्दल मोदी सरकारला सलाम. या तणावपूर्ण वातावरणात आपल्याला आपल्या डिजिटल बॉर्डरचीही रक्षा करायला हवी.", अशा शब्दात रुपालीने पंतप्रधान मोदींंचं कौतुक केलं.
पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचे सांगाडे सापडले
६-७ मे रोजीच्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने ८ मे रोजीच्या रात्री भारतीय सैन्य तळांवर हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले. पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागल्या, पण त्या हवेत फुस्स झाल्या. भारताच्या लष्कराने केलेल्या वारामुळे या मिसाईल आणि ड्रोन्सचे सांगाडेच जमिनीवर पोहोचले. यातील काही निष्क्रिय करण्यात आलेल्या मिसाईल सापडल्या आहेत.