Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)च्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपासात असे दिसून आले आहे की शेफाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे अँटी एजिंग औषधे घेत होती. २७ जून रोजी तिच्या घरी पूजा आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे शेफालीचा उपवास होता, परंतु तरीही तिने त्याच दिवशी दुपारी अँटी एजिंग औषधाचे इंजेक्शन घेतले. ही औषधे तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्षानुवर्षे देण्यात आली होती आणि तेव्हापासून ती दरमहा ही उपचारपद्धती घेत होती. पोलिसांना संशय आहे की ही औषधे तिच्या अचानक मृत्यूचे एक प्रमुख कारण असू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.
घटनेच्या वेळी, रात्री १० ते ११च्या दरम्यान, शेफालीची तब्येत अचानक बिघडली, तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती बेशुद्ध पडली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. घटनेच्या वेळी शेफालीचा पती पराग, आई आणि इतर काही सदस्य घरी उपस्थित होते. फॉरेन्सिक टीमने त्यांच्या घरातून विविध प्रकारची औषधे जप्त केली आहेत, ज्यात अँटी-एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि गॅस्ट्रिकशी संबंधित गोळ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात कुटुंबातील सदस्य, घरातील नोकर आणि बेलव्ह्यू हॉस्पिटलमधील डॉक्टर यांचा समावेश आहे.
शेफाली मृत्यूप्रकरणी पोलीस करताहेत तपास
तपासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या वादाचे किंवा भांडणाचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि औषधांच्या लॅब टेस्टच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत, जेणेकरून मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. या प्रकरणात तपास सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण अहवाल समोर येण्याची अपेक्षा आहे. २७ जूनला रात्री उशिरा शेफालीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पती पराग त्यागी आणि इतर तिघे जण तिला मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफाली जरीवाला २००२ मध्ये १९७२ साली 'समाधी' चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या क्लासिक गाण्याच्या 'कांटा लगा'च्या रीमिक्समध्ये झळकली होती. या गाण्याला खूप पसंती मिळाली आणि या गाण्यामुळे ती 'कांटा गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली.