सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असणारी अंकिता ही प्रत्येक वेळी नवनवीन विषय, आयुष्यातील घडामोडी, अनुभव त्याचसोबत सामाजिक विषयांवर मनमोकळेपणाने आपले मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर ती नेहमीच व्यक्त होत असते. महत्वाचे म्हणजे अंकिताच्या चाहत्यांना देखील तिच्या या पोस्ट प्रचंड आवडतात. अशामध्ये अंकितानं 'बिस बॉस मराठी'च्या घरातील आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी झाली होती. 'बिग बॉस मराठी ५'मधून अंकिता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. 'बिग बॉस'चे पर्व गेल्या वर्षी २८ जुलैदिवशी सुरू झाले होते. यानिमित्त अंकिताने पोस्ट केली आहे. तिनं लिहलं, "अगदी एक वर्षापूर्वी...तो दरवाजा उघडला, प्रकाश झळकला आणि कधी नव्हे एवढं माझं हृदय जोरात धडकत होतं. ते फक्त घर नव्हतं, तर एक वेगळ जग होतं, ज्यात मी पाऊल टाकलं होतं. ३६५ दिवस झाले त्या क्षणाला, जेव्हा मी त्या घरात शिरले… आणि सगळं काही बदललं. लोकांनी मतं मांडली, प्रश्न विचारले, कौतुक झालं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी मीच होते. ते पहिलं पाऊल… उत्सुकता, भीती, अनिश्चितता याने भरलेलं होतं. हे मी करु शकेल का? या गोंधळात मी माझं खरं रूप शोधू शकेन का? असे प्रश्न पडले होते".
पुढे तिनं लिहलं, "'बिग बॉस मराठी'च्या घरातला पहिला दिवस अजूनही कालसारखाच वाटतो. अपरिचित चेहरे, अनोळखी नियम, अनियंत्रित भावना... त्या घरात मला स्वतःबद्दल काही गोष्टी कळाल्या, ज्या मलाही माहित नव्हत्या. एका वर्षानंतर आजही तिथे शिकलेले धडे, प्रेम आणि ती आग माझ्यासोबत आहे. कारण त्या एका पावल्यानं सगळं बदललं. मला अधिक मजबूत, खरं, संवेदनशील… आणि लोकांनी मला पाहिलं. 'बिग बॉस मराठी सीझन ५'ला एक वर्ष पूर्ण झालंय. काय प्रवास होता… काय जीवन होतं… आजही अंगावर काटा येतो", या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात.