Join us

'मुलगी झाली हो' नंतर किरण माने पुन्हा दमदार भूमिकेत; 'या' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 18:17 IST

Kiran mane: किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आगामी मालिकेविषयी सांगितलं आहे.

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे किरण माने (KIRAN MANE). मुलगी झाली हो या मालिकेमुळे किरण माने प्रचंड चर्चेत आले. या मालिकेतील महिला सहकलाकारांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांचा छोट्या पडद्यावरील वावर काही काळासाठी कमी झाला होता. मात्र, बिग बॉस मराठीमध्ये झळकल्यानंतर पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या मालिकेत झळकण्यास ते सज्ज झाले आहेत. 

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आगामी मालिकेविषयी सांगितलं आहे. किरण माने लवकरच 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.  हा प्रोमो शेअर करत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे किरण मानेंची पोस्ट

"प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही. आता माझी ही जी कलाकृती येतेय... ती तुमचे मनोरंजन तर करेलच, पण तुमचं आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाचं काहीतरी देण्याची ताकदही यात असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. 'मालिका उथळ असतात', 'सासु-सून, नणंद-भावजया यांच्यातला कलह किंवा विवाहबाह्य संबंध यापलीकडे मालिकांना विषय नसतात' अशा तक्रारी कायम केल्या जातात. त्यात तथ्यही आहे. पण आता या सगळ्या चौकटी मोडून-तोडून प्रेक्षकांना एक अस्सल, आशयघन, प्रभावी आणि काळजाला स्पर्श करणारं काहीतरी देण्याचा प्रयत्न 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून केला आहे.

या सिरीयलमध्ये टीआरपीच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे भरले जाणार नाहीत. या सिरीयलमध्ये कथानकात पाणी घालून ते पसरट केले जाणार नाही. या सिरीयलच्या चित्रीकरणापासून दिग्दर्शनापर्यन्त आणि लेखनापासून अभिनयापर्यन्त सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा दर्जेदार सिनेमा पहात असल्यासारखा आनंद देतील ! तुम्ही, विशेषत: ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी मला लावलेला अतोनात जीव, हे माझं बळ आहे. एक अभिनेता म्हणून मला तुमचं प्रचंड प्रेम लाभलंय. चाहत्यांचं हे प्रेम सार्थ ठरावं यासाठी, या जगावेगळ्या मालिकेतली एक अफलातून भुमिका मी समरसून, तनमन अर्पून साकारण्याचा प्रयत्न करतोय...",अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

दरम्यान, येत्या 15 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत किरण माने मुख्य भूमिका साकारणार असून अद्याप त्यांच्या भूमिकेचं नाव समोर आलेलं नाही. त्यामुळे या मालिकेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

टॅग्स :किरण मानेटेलिव्हिजनसेलिब्रिटी