२०१७ साली मनोरंजनविश्वात मी टू मोहिमेमुळे खळबळ माजली होती. नावाजलेल्या सेलिब्रिटींवर काही अभिनेत्रींनी आरोप लावत त्यांचं सत्य जगासमोर आणलं होतं. बॉलिवूडमधला प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवरही (Sajid Khan) काही अभिनेत्रींनी आरोप केले होते. याचा साजिदच्या करिअरवर परिणाम झाला होता. आता इतक्या वर्षांनंतर पु्न्हा एका अभिनेत्रीने साजिदचा खरा चेहरा समोर आणला आहे. साजिदने तिला कपडे काढून इनरवेअरमध्ये बसायला सांगितलं होतं असं ती म्हणाली.
'मिले जब हम तुम' मालिकेत दियाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री नवीना बोलेने (Navina Bole) नुकतंच साजिद खानवर आरोप केले आहेत. सुभोजित घोषला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "तो अतिशय घाणेरडा माणूस आहे. मी आयुष्यात पुन्हा कधीच त्याला भेटणार नाही. ग्लॅडरॅग्स मॅगझीननंतर तो आमच्यापैकी अनेकांच्या मागे लागला होता. महिलांचा अनादर करत त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या."
ती पुढे म्हणाली, "साजिद तेव्हा हे बेबी सिनेमाचं काम करत होता. तेव्हा त्याने मला भेटायला बोलवलं. मी खूप उत्साहित झाले होते. कारण मला बॉलिवूड सिनेमात काम करायला मिळणार होतं. मी त्याच्यासमोर गेले. तो मला म्हणाला, 'तू तुझे कपडे काढून लॉन्जरीमध्ये का नाही बसत, तू तशी खरंच किती कंफर्टेबल आहेस मला पाहायचं आहे.'. ही घटना २००४ किंवा २००६ ची आहे जेव्हा मी ग्लॅडरॅग्समध्ये सहभाग घेतला होता."
"एक वर्षानंतर जेव्हा मी मिसेस इंडियासाठी परफॉर्म करत होते तेव्हा मला साजिदचा पु्न्हा एकदा फोन आला होता. त्याने मला मी काय करतेय, मी एका भूमिकेसाठी त्याला भेटलं पाहिजे असं तो म्हणाला. तेव्हा मला वाटलं की हा माणूस बऱ्याच मुलींशी असंच बोलत असेल. याने मला एक वर्षापूर्वी घरी बोलवलं होतं हे त्याला आठवतही नसेल." असंही ती म्हणाली.