Join us

"छावा वाईट सिनेमा" आस्ताद काळेच्या वक्तव्यावर मेघा धाडेची प्रतिक्रिया, म्हणाली "इतिहास सांगायला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 09:37 IST

अभिनेत्री मेघा धाडेनं हिनं आस्तादच्या 'छावा' सिनेमाबद्दलच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 Megha Dhade Slams Astad Kale: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची खूप चर्चा झाली. प्रत्येकानं या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक केलं. 'छावा' चित्रपटानं फक्त प्रेक्षकांची मन जिंकली नाही तर बॉक्स ऑफिसही गाजवलं. या चित्रपटानं  भारतात ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'छावा'मध्ये अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. मराठी अभिनेता आस्ताद काळे सिनेमात दिसला. पण, त्याने "छावा वाईट फिल्म आहे" असं वक्तव्य केलं . यासोबत त्याने सिनेमाबद्दल काही खुलासे केले.  'छावा' सिनेमावर टीका केल्यानं आस्ताद वादाच्या विळख्यात अडकला आहे. अभिनेत्री मेघा धाडेनं हिनं आस्तादच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकतंच मेघाने 'अमृता फिल्म्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मेघानं "जर सिनेमाबद्दल खात्रीच नव्हती तर तू स्वत:हून कामच का केलं", असा प्रश्न विचारला. मेघा म्हणाली, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरी मला आस्तादचं म्हणणं मला पटलेलं नाही. ती फिल्म वाईट आहे आणि इतिहास म्हणून तो चित्रपट चुकीचा आहे असं तो जे बोलला, ते मला पटलं नाही. अरे बाबा जर कोणीतरी इतक्या मोठ्या पातळीवर आपल्या शंभूराजांना, त्यांनी दिलेल्या बलिदानाला सगळ्या जगात पोहोचवत आहे, हा विचार तू का करत नाहीयेस. मग मला असं म्हणायचं आहे की, आतापर्यंत त्याने जे चित्रपट केले, ते सगळे चित्रपट चांगले होते का? शंभर टक्के ते चित्रपट खरंच चांगले होते का? बरं तुला खात्री नव्हती, तर त्यात या सिनेमात तू स्वत:हून काम का केलं?, असा थेट सवाल तिनं आस्तादला केला. 

पुढे मेघा म्हणाली, "तुम्ही त्या चित्रपटाचा हेतू लक्षात घ्या. कधी कधी काही गोष्टी या काळाची गरज असतात. प्रत्येक गोष्ट तांत्रिकरित्या किती योग्य आहे हे बघण्याइतकं टीकात्मक होऊ नका. आज कितीतरी मुलांना हा इतिहास माहीत नाही. सगळ्यांच्या नशिबात आस्तादच्या बाबांसारखे बाबा नाहीत की, ते त्याला छान इतिहास समजवतील किंवा मराठी सांगू शकतील. त्यामुळे मला वाटतं की, आपल्या अनेक पुढच्या पिढ्या आहेत, ज्यांना आईवडिलांकडून इतिहास कळणारही नाहीये. त्यामुळं अशा सिनेमांच्या रुपात त्यांना हा इतिहास कळेल", असं तिनं म्हटलं. 

नेमकं काय म्हणाला होता आस्ताद?

काही दिवसांपुर्वी आस्ताद काळेने 'छावा'बद्दल फेसबूक पोस्ट शेअर करत चित्रपटातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले होते. "छावा वाईट फिल्म आहे" असं त्यानं म्हटलं होतं. आस्तादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "औरंगजेबाचे वय आणि आजारपण बघतात तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायेत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?". तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने लिहलं होतं,  "मी आता खरं बोलणार आहे...छावा. वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे". ट्रोलिंग झाल्यावर त्याने या पोस्ट काढूनही टाकल्या होत्या. 

टॅग्स :मेघा धाडेअस्ताद काळे'छावा' चित्रपट