'मॅडम सर' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री गुल्की जोशीने (Gulki Joshi) नुकताच एक प्रसंग सांगितला. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला अवॉर्ड देताना तिला गर्दीने घेरले होते. आपल्यासोबत विचित्र घटनाही घ़डू शकली असती असं ती म्हणाली. काही वर्षांपूर्वी रांचीमध्ये घडलेल्या त्या प्रसंगाची आठवण काढत तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. नक्की काय म्हणाली गुल्की जोशी?
'मॅडम सर' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गुल्की जोशीने हसीना मलिकची भूमिका साकारली होती. गुल्की मूळची रांचीची आहे. जेव्हा केव्हा ती रांचीला जाते तेव्हा अनेकदा ती गर्दीत घेरली गेली आहे. असाच एक अनुभव सांगताना ती म्हणाली, "काही वर्षांपूर्वी मी रांचीमध्ये असताना एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा माझा नादान परिंदे शो लोकप्रियतेच्या शिखरावर होता. म्हणूनच मला इव्हेंटमध्ये बोलवण्यात आलं होतं. तसंच माझ्या हस्ते महेंद्रसिंह धोनीला अवॉर्डही मिळणार होता. शांततेच सुरु असणाऱ्या कार्यक्रमात अचानक गर्दी झाली. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. धक्काबुक्की होऊ लागली. मी या गर्दीत घेरले गेले होते. तेव्हाच मला मनात विचार आला की या गर्दीत माझ्यासोबत काहीही चुकीची घटना होऊ शकते. कोणीही मला कुठेही हात लावू शकतं माझा विनयभंग होऊ शकतो असा भयावह विचार माझ्या मनात आला होता."
ती पुढे म्हणाली, "नशीब बलवत्तर म्हणून सुरक्षारक्षकांनी वेळीच मला त्यातून सोडवलं. त्यांनी मला सुरक्षित बाहेर काढलं. पण माझ्या मनात भीती कायम होती. तो क्षण मला हादरवून सोडणारा होता. पहिल्यांदाच मला गर्दीची, लोकांची खरोखरंच भीती वाटली होती." फिल्मी मंत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हे सांगितलं.
धोनीसोबतची आठवण
या सगळ्या प्रसंगानंतरही इव्हेंट यशस्वी झाला. धोनीसोबतची आठवण सांगताना गुल्की म्हणाली, "मी अखेर जेव्हा धोनीला भेटले तेव्हा तो अगदी रिअल हिरोसारखाच नम्र, प्रेमळ आणि डाऊन टू अर्थ वाटला. भलेही तो मॅचनंतर थकलेला होता तरी त्याने सर्व चाहत्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आनंदाने फोटोही काढले. त्याला भेटून मलाही खूप छान वाटलं."