Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भूमिकेमुळे 'मुलगी झाली हो' मालिकेतून बाहेर काढल्याचा अभिनेते किरण मानेंचा आरोप, सोशल मीडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 00:48 IST

Kiran Mane News: प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाबरोबरच राजकीय आणि सामाजिक विषयांवरील प्रखर भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. किरण मानेंना Mulgi Jhali Ho मालिकेतून बाहेर करण्यात आले असून, आपल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला बाहेर काढल्याचा आरोप मानेंनी केला आहे.

मुंबई - प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाबरोबरच राजकीय आणि सामाजिक विषयांवरील प्रखर भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांबाबत ते सोशल मीडियावर व्यक्त होत आले आहेत. मात्र आता हीच राजकीय भूमिका त्यांना नडल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही काळापासून किरण माने हे स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेत काम करत होते. मात्र त्यांना या मालिकेतमधून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आपल्याला आपल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला आहे. 

किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली असून, त्यामधून त्यांनी सूचक इशारा दिला आहे. काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा... गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा!!! असे त्यांनी या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर आता किरण माने यांच्या चाहत्यांकडून समर्थनार्थ प्रतिक्रिया येत आहेत. मात्र काही प्रतिक्रियांमधून त्यांच्यावर टीकाही होत आहे.

तसेच याबाबत किरण माने म्हणाले की, मला मालिकेतून बाहेर काढण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं गेलं. महाराष्ट्रात असं होणार नाही, असं मला वाटत होतं. मात्र माझ्याबाबतीत असं घडलं. मी बळी पडलो आहे. हा अभिनयक्षेत्रात माझा झालेला खून आहे. ही बाब मी जीवनभर लक्षात ठेवीन, अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.

किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेत वडिलांची भूमिका करत होते. तसेच त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अशा परिस्थितीत त्यांना तडकाफडकी मालिकेतून बाहेर काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच आता या विषयाने राजकीय वळण घेतले आहे. तसेच  #IStandWithKiranMane हा ट्रेंड ट्विटर वर ट्रेंड होत आहे.

दरम्यान, या घटनेचा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही निषेध केला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे.

टॅग्स :किरण मानेस्टार प्रवाहराजकारणसोशल मीडिया