Join us

आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री होताच अनिरुद्धला मिळालं गिफ्ट; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:45 IST

Milind gawali: अलिकडेच मोठ्या थाटात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यात मिलिंद गवळी यांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्याच्या घडीला जितकी लोकप्रिय होत आहे. तितकेच या मालिकेतील कलाकार लोकप्रिय होताना दिसून येतात. यातलंच एक नाव म्हणजे मिलिंद गवळी. अनिरुद्ध ही नकारात्मक भूमिका साकारुनही मिलिंद यांनी लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच आज सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम त्यांच्याविषयी वा त्यांच्या मालिकेविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी गोकुळाष्टमी निमित्त एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेतील एका नव्या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.

अलिकडेच मोठ्या थाटात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यादिवशी काही स्पेशल पोस्ट शेअर केल्या. यात मिलिंद गवळी यांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी त्यांना मालिकेतील एका अभिनेत्याने मदत केली.

"हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे,कृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडी, सगळेच कृष्णमय होऊन जातं, मी किती भाग्यवान आहे, आयुष्यामध्ये अनेक वेळा कृष्णाची भूमिका करायला मिळाली, कमीत कमी चार सिनेमांमध्ये मी कृष्ण साकारला आहे. सिनेमामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमिका कोणाची असेल तर ती श्रीकृष्णाची असू शकते, गेले दोन दिवस आई कुठे काय करते या सिरीयल साठी आम्ही जन्माष्टमी दहीहंडी याचं शूटिंग करतो आहे, साग्रसंगीत कृष्ण जन्माष्टमीची पूजा झाली. आणि आज दहीहंडी सुद्धा सगळे खेळले, परत मला माझ्या कृष्णाच्या भूमिका आठवत होत्या.त्याचा व्हिडिओ तयार केला," असं मिलिंद म्हणाले. 

पुढे ते म्हणतात,"व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडला होता, मी जर माझाच सिनेमातल्ं गाणं जर बॅकग्राऊंड म्हणून वापरलं तर माझ्यावर कॉपीराइट्स येऊ शकतो असं बरेच वेळेला झाला आहे, विचार करत असताना शूटिंगमध्ये एक नवीन अनिश नावाच्या कॅरेक्टरची एन्ट्री झाली आहे. सुमंत ठाकरे @sumant_thakre ती भूमिका निभावत आहे. या मुलाचा गळा इतका गोड आहे, आपलं मन मोहून टाकतो, मी त्याला म्हटलं की माझ्या या कृष्णाच्या व्हिडिओ साठी एखादं गाणं म्हण ना please , आणि त्यानं हे सुरेख गाणं म्हंटलं, असं म्हणत मिलिंद यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, नुकतीच या मालिकेत सुमंत ठाकरे याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत त्याने आशुतोषच्या पुतण्याची भूमिका साकारली आहे.  

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिका