Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अभिनेत्री व्हायचं होतं पण...", तारक मेहताच्या सोनू भिडेने का निवडला वेगळा मार्ग? आहे भावुक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:38 IST

झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील सर्वात पहिली सोनू आठवतेय? तिचं नाव आहे झील मेहता (Jheel Mehta). २००८ साली मालिका सुरु झाली तेव्हा झील मेहता भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका करत होती. मात्र २०१२ साली तिने मालिका सोडली. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी आता १२ वर्षांनंतरही लोक तिला विसरलेले नाहीत. पण झील नंतर कधीच अभिनय करताना दिसली नाही. याचं कारण तिने नुकतंच सांगितलं आहे.

झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान झीलने मालिका सोडल्याचं आणि नंतर पुन्हा अभिनयात न येण्याचं कारण समोर आलं आहे. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' मध्ये झीलची स्टोरी आली आहे. यात ती म्हणते, "मी लहानपणी काही जाहिरातीत काम केलं होतं. एकदा आम्हाला तारक मेहता शो सुरु होतोय याबद्दल समजलं. तेव्हा आईने मला ऑडिशन देणार का? असं विचारलं. मी हो म्हणलं, ऑडिशन दिली आणि असित मोदींनी माझी सोनूच्या भूमिकेसाठी निवड केली. जेव्हा सगळे तारक मेहता टीव्हीवर एन्जॉय करत होते तेव्हा मी ते खरोखर जगत होते. पण २०१२ मध्ये बोर्ड परिक्षांसाठी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मला शिक्षणावर लक्ष द्यायचं होतं."

ती पुढे म्हणते, "शिक्षण संपल्यानंतर मी पुढे अभिनयच करेन असं मला वाटलं होतं. पण २०१९ मध्ये माझ्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का आला. मग मी अभिनय बाजूला ठेवून वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायचा निर्णय घेतला. ती छोटी मुलगी जी स्टुडिओच्या प्रकाशात स्वप्न बघायची तिचं नवं स्वप्न होतं ते म्हणजे बिझनेसवुमन व्हायचं आणि तेही अभिनयासारखंच अगदी मनातून होतं."

झील मेहता मेकअप आर्टिस्ट आहे. ती आणि तिची आई मिळून हे काम करतात. तसंच तिचं 'सेफ स्टुडंट हाऊसिंग' हे हॉस्टेलही आहे जे मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. झील मेहता २८ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.यावर्षी जानेवारी महिन्यात तिने साखरपुडा केला होता.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारसोशल मीडिया