रील स्टार आणि बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आलेला सूरज चव्हाण त्याच्या 'झापुक झुपूक' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून सूरज मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सूरजचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या 'झापुक झुपूक' सिनेमासाठी आणि सूरजला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सूरजचा असाच एक छोटा फॅन रितेश देशमुखला भेटला.
रितेश सध्या व्हॅकेशन मोडवर आहे आणि भटकंती करत आहे. त्याचदरम्यान रितेशला एक चिमुकला भेटला. त्याने रितेशसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. "मला तू कुठे पाहिलं?" असं रितेशने विचारताच चिमुकल्याने पिक्चरमध्ये बघितलं असं सांगितलं. त्यावर रितेश देशमुखने कोणत्या पिक्चरमध्ये बघितलं असं चिमुकल्याला विचारलं. त्याच्यावर तो चिमुकला म्हणाला, "मी तुम्हाला सूरज चव्हाणच्या पिक्चरमध्ये बघितलं". हे ऐकून रितेशही आश्चर्यचकित झाला. पुढे म्हणाला, "घ्या हे झापुक झुपूक, काढा फोटो". हा व्हिडिओ सूरजच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं आहे. या सिनेमात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत