Join us

दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

By देवेंद्र जाधव | Updated: November 22, 2024 16:37 IST

साऊथ सिनेमात दाखवलेल्या एका गोष्टीमुळे एक तरुण मालामाल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय

कोणाचं आयुष्य कसं आणि कधी बदलेल काही सांगता येत नाही. याचाच अनुभव देणारं एक प्रकरण समोर आलंय. सिनेमात दाखवलेल्या छोट्याश्या सीनमुळे एक इंजिनीअरींगचा विद्यार्थी करोडपती होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या भारतात चांगलं गाजत असून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. साई पल्लवी-शिवकार्तिकेयन या दोन प्रमुख कलाकारांची भूमिका असलेला 'अमरन' सिनेमासंबंधी हा किस्सा आहे. काय घडलंय नेमकं?

तरुणाचा मोबाईल नंबर सिनेमात झळकला अन्...

 खऱ्या आयुष्यातील मिलिटरी ऑफिसरच्या आयुष्यावर आधारीत 'अमरन' सिनेमा लोकांना आवडतोय अन् सिनेमा सुपरहिटही झालाय. पण हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. झालं असं की, चेन्नईमध्ये शिकणाऱ्या वीवी वागीसन या इंजिनीअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्याने 'अमरन' सिनेमाच्या मेकर्सना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. साई पल्लवीचे चाहते त्याला वारंवार फोन करत आहेत, असा आरोप त्याने केलाय. सातत्याने येणाऱ्या फोन कॉल्सना वागीसन कंटाळला असून त्याने 'अमरन'च्या मेकर्सवर १.१० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. 

सिनेमातील एका सीनमध्ये वागीसनचा नंबर झळकला

'अमरन' सिनेमात साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयन यांच्यामध्ये एक रोमँटिक सीन आहे. मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि सिंधु रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत आहे. या सीनमध्ये सिंधु एक कागद मेजर मुकुंदजवळ फेकते. या कागदावर सिंधुचा मोबाईल नंबर असतो. सिनेमात दाखवलेला मोबाईल नंबर वागीसनचा खरा फोन नंबर असल्याने सर्व गडबड झालीय. साई पल्लवीचे फॅन्स या मोबाईल नंबरवर फोन करुन वागीसनला अभिनेत्रीशी संपर्क साधून देण्याची मागणी करत आहेत.

वागीसनने पाठवली कायदेशीर नोटिस

वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून वीवी वागीसन या इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याने 'अमरन' सिनेमाच्या मेकर्सवर मानसिक त्रास झाल्यामुळे १.१० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केलीय. याशिवाय सिनेमातून हा सीन काढून टाका असंही त्याने सांगितलंय. "फिल्म रिलीजनंतर या घटनेमुळे मी नीट झोपू शकत नाही किंवा अभ्यास करु शकत नाही. मी सुरुवातीला सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी आणि सिनेमातील कलाकार शिवकार्तिकेयनला टॅग करुन या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही." आता या घटनेनंतर 'अमरन'चे निर्माते कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे

 

टॅग्स :साई पल्लवीTollywoodचेन्नई