Join us

श्रीदेवी मृत्यू प्रकरण : दुबईच्या सरकारी वकिलांकडून केस बंद, बोनी कपूर यांना क्लीन चिट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:15 IST

 श्रीदेवी यांच्या आकस्मिक झालेल्या मृत्यूची कसून चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद...

दुबई -  श्रीदेवी यांच्या आकस्मिक झालेल्या मृत्यूची कसून चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद नसल्याचे सांगत, या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. चौकशीची प्रक्रिया आटोपल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले असून, आज रात्री  श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.शवविच्छेदन अहवालात श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे तसेच त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत गुढ निर्माण झाले होते. हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याने  दुबई पोलिसांनी सखोल तपास करत  श्रीदेवींचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील स्टाफ तसेच पती बोनी कपूर आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर आज दुपारी श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी परवानगी दिली होती. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले होते. आता संध्याकाळी सहाच्या सुमारास श्रीदेवींचे पार्थिव घेऊन विमान रवाना होणार असून, हे विमान रात्री नऊच्या सुमारास मुंबईत पोहोचेल. एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी ह्या दुबईत गेल्या होत्या तेथे शनिवारी रात्री जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रुम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :श्रीदेवीमृत्यूबॉलिवूड