Join us

बिग बजेट... मोठे स्टार्स नाही तर कथेत पाहिजे दम, साऊथचा 'हा' चित्रपट घालतोय धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:33 IST

प्रेक्षकांची पहिली पसंत बनला आहे 'हा' चित्रपट, फक्त पाच दिवसात अख्खं बजेट केलं वसूल

अनेकदा तगडी स्टारकास्ट असलेले बिग बजेट चित्रपट फ्लॉप होतात.  पण, चित्रपट थिएटरमध्ये चालण्यासाठी मोठे बजेट, भव्यदिव्य सेट आणि मोठी स्टारकास्ट नाही, तर दमदार कथा, उत्तम दिग्दर्शन आणि हृदयस्पर्शी अभिनय हवा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.  कमी बजेटमध्ये मोठे चमत्कार कसा घडवायचा हे मल्याळम चित्रपटांनी दाखवून दिलं आहे. मल्याळम चित्रपटसृष्टी सतत एकामागून एक दमदार चित्रपटांची निर्मिती करत आहे. मग तो रेखाचित्रम असो वा ऑफिसर ऑन ड्यूटी असो किंवा ब्रोमान्स असो. या कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता आणखी एका मल्याळम चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. 

 नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची कथा आणि अभिनयानं चाहत्यांची मन जिंकली आहेत. 'अलाप्पुझा जिमखाना' (Alappuzha Gymkhana) असं या चित्रपटाचं नाव आहे. खालिद रहमान दिग्दर्शित हा  चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने फक्त पाच दिवसांत आपले बजेट तर वसूल केलंच, सोबत नफाही कमावलाय. या चित्रपटाचं बजेट हे फक्त १२ कोटी रुपये होतं. तर गेल्या पाच दिवसांत सिनेमानं सुमारे १८.१८ कोटी रुपये कमावले आहेत.

स्पोर्ट्स कॉमेडी असलेला 'अलाप्पुझा जिमखाना'मध्ये एक तरुण बॉक्सर त्याच्या प्लस टू परीक्षेत नापास झाल्यानंतर स्पोर्ट्स कोट्यातून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतो. तो बॉक्सिंग निवडतो आणि नशिबाने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकतो. जेव्हा  उच्च दर्जाच्या बॉक्सर्सशी स्पर्धा करण्याची वेळ येते,  तेव्हा कथेला एक गंभीर वळण मिळते.  या सिनेमात अभिनेता नसलीन के. गफ़ूर ए शिवाय लुकमान अवरान गणपती, रेडिन किंग्सले, अनघा रवी, बेबी जीन, शिवा हरिहरन, संदीप प्रदीप, फ्रँको फ्रान्सिस यांच्या भूमिका आहेत. थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु मे २०२५ मध्ये हा चित्रपट प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की अमेझॉन प्राइम किंवा नेटफ्लिक्सवर प्रदर्शितत होऊ शकतो.  

टॅग्स :Tollywoodसिनेमाबॉक्स ऑफिस कलेक्शन