अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) सौंदर्याची कायम चर्चा होत असते. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत ती आघाडीवर आहे. मधल्या काळात तिच्या आयटम साँग्सने धुवाँ उडवला होता. 'आज की रात' असो किंवा 'नशा' या दोन्ही गाण्यांमध्ये तिने आपला जलवा दाखवला. नुकतंच एका मुलाखतीत तमन्ना भाटियाने अनेक विषयांवर संवाद साधला. ब्युटी सिक्रेट, इंडस्ट्रीतले अनुभव, ट्रोलिंग यावर ती सविस्तर बोलली. एका सिनेमातून तिला कशाप्रकारे बाहेर काढण्यात आलं याचाही किस्सा तिने सांगितला.
तमन्ना भाटियाने नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिली. सुरुवातीच्या काळात तुझ्या कमी अनुभवाचा, इंडस्ट्रीत नवीन असण्याचा कोणी फायदा घेतला का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "हो, अनेकदा आला. लोक तुम्हाला नाही तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही लहान आहात आणि तुम्हाला काहीच माहित नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात."
एक किस्सा सांगताना तमन्ना म्हणाली, "मी साउथच्या एका मोठ्या स्टारसोबत काम करत होते. मला एका सीनमुळे अडचण होती. मी थेट सांगितलं की मला हा सीन करायचा नाही. तर त्या कलाकाराने सेटवर सर्वांसमोर जाहीर केलं की 'हिरोईन चेंज कर दो'. माझ्यासमोरच तो असं बोलल्याने मी शॉक झाले होते."
तमन्नाने नाव न घेता हा किस्सा सांगितला. इंडस्ट्रीत कशा प्रकारे या गोष्टी चालतात हे तिने अधोरेखित केलं. तमन्ना लवकरच 'वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.