Join us

साऊथ अभिनेत्रीने मुंबईच्या गॅलरी आर्टिस्टबरोबर केला साखरपुडा, नुकताच दिला सुपरहिट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 14:11 IST

अभिनेत्री कोण्या सुपरस्टारसोबत नाही तर गॅलरी आर्टिस्टच्या पडली प्रेमात. गेल्या १४ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीच्या सावत्र आईचीही हजेरी.

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार नुकतीच 'हनुमान' या गाजलेल्या सिनेमात झळकली. तेरा सज्जाच्या 'हनुमान' सिनेमाने बॉलिवूडच्या सिनेमांनाही मागे टाकलं. वरलक्ष्मीने आता तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. नुकतंच तिने बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला. सध्या सर्वच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिचा जीवनसाथी नक्की कोण आहे याची चर्चा साऊथ इंडस्ट्रीत सुरु झाली आहे.

वरलक्ष्मी सरथकुमारने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०१२ साली आलेल्या तमिळ फिल्म 'पोडा पोडी' मधून तिने  करिअरची सुरुवात केली. वरलक्ष्मीने शुक्रवारी 1 मार्च रोजी मुंबईच्या आर्ट गॅलरिस्ट निकोलाई सचदेवसोबत मुंबईतच साखरपुडा केला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाने कपलच्या साखरपुड्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "वरलक्ष्मी आणि निकोलाई यांनी १ मार्च रोजी मुंबईत कुटुंबाच्या साक्षीने साखरपुडा केला. दोघंही गेल्या १४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी एकमेकांना अंगठी घालत जीवनातील पुढील टप्प्याची सुरुवात केली आहे."

वरलक्ष्मीने साखरपुड्यासाठी आयव्हरी सिल्क साडी परिधान केली होती. यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.  तर निकोलाईने पारंपरिक पेहराव केला होता ज्यात तोही खूप हँडसम दिसत होता. वरलक्ष्मी साऊथचे दिग्गज अभिनेता आणि राजकारणी सरथकुमार रामनाथन यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी राधिका वरलक्ष्मीची सावत्र आई आहे. राधिका या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनीही वरलक्ष्मीच्या साखरपुड्याला हजेरी लावली.

सेलिब्रिटींचंलग्न म्हटलं की बिझनेसमॅन किंवा फिल्म स्टार्ससोबतच त्यांची लग्न होतात. मात्र वरलक्ष्मीने एका गॅलरी आर्टिस्टची निवड केली. यावर्षीच्या शेवटी दोघंही थाटामाटात लग्न करणार आहेत. 'हनुमान'च्या यशानंतर वरलक्ष्मी लवकरच धनुषसोबत 'रायन' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :Tollywoodमुंबईलग्नसेलिब्रिटी