सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा मृत्यू झाला आहे. तिरुअनंतपूरम येथील हॉटेलमधील रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वी त्यांनी या हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. रुममधून दुर्गंधी येत असल्याने हॉटेल स्टाफने दरवाजा तोडून आत पाहिलं तेव्हा दिलीप शंकर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
दिलीप शंकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर एका गंभीर आजाराचा सामना करत होते. पण, त्यांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला. हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिलीप शंकर पंचाग्नि या मालिकेत शेवटचे दिसले होते. या मालिकेत त्यांनी चंद्रसेनन ही भूमिका साकारली होती. तर 'अम्मायारियाथे'मधील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. त्यांच्या निधनावर मल्याळम सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.