दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार एक म्हणजे रजनीकांत (Rajinikanth) आणि दुसरे कमल हासन (Kamal Haasan). दोघांचा चाहतावर्ग किती मोठा आहे याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. अनेक वर्षांपासून दोघंही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तब्बल ४६ वर्षांपूर्वी हे दोघंही एका सिनेमात दिसले होते. आता इतक्या वर्षांनी ते पुन्हा एकत्र येत आहेत. कमल हासन यांनी स्वत: या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.
दुबईत झालेल्या 'नेक्सा सिमा अवॉर्ड्स २०२५' मध्ये कमल हासन देखील सहभागी झाले होते. तसंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनके दिग्गजांनी अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कमल हासन यांना रजनीकांत यांच्यासोबत पुन्हा काम ककत आहात का असं विचारलं. त्यावर कमल हासन यांनी होकार दिला. ते म्हणाले, "आम्ही खूप आधीच एकत्र आलो होतो. आम्ही इतकी वर्ष वेगळे झालो होतो कारण सगळे आम्हाला अर्ध अर्ध बिस्कीट देत होते. पण आम्हाला दोघांना एक एक पूर्ण बिस्कीट हवं होतं. आम्हाला ते मिळालं आणि आम्ही ते एन्जॉय केलं. आता आम्ही अर्ध्या बिस्कीटावरही संतुष्ट आहोत आणि म्हणूनच पुन्हा सोबत येत आहोत."
रजनीकांत यांच्यासोबतच्या स्पर्धेविषयी ते म्हणाले, "आम्हाला अशी संधी मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण असंच राहायचं आणि एक आदर्श ठेवायचा हे आम्ही खूप आधीच ठरवलं होतं. त्यानुसार तेही तसेच राहिले आणि मीही. त्यामुळे भलेही हे रियुनियन बिझनेसच्या अँगलने आश्चर्य वाटणारं असलं तरी आम्हाला याचं इतकं नवल वाटत नाहीये. हा फक्त जे खूप आधी व्हायला हवं होतं ते आता होत आहे याचा आनंद आहे."
कमल हासन यांनी रजनीकांत यांच्यासोबत सिनेमा कन्फर्म केला असला तरी सिनेमाविषयी आणखी माहिती दिलेली नाही. लोकेश कनगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत अशीही चर्चा आहे. रजनीकांत यांचा 'कुली' नुकताच रिलीज झाला आहे जो लोकेश कनगराज यांनीच दिग्दर्शित केला. तसंच त्यांनी कमल हासन यांच्यासोबत 'विक्रम' सिनेमा केला होता.