Fahad Fasil Phone: सिनेविश्वात विविधांगी अभिनयाची छाप सोडणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे फहाद फासिल. अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' सिनेमामध्ये 'भंवर सिंह शेखावत' या भुमिकेतून फहाद फासिलनं आपली छाप सोडली. फहाद फासिलचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. पण, फहादला आपलं आयुष्य हे खाजगी ठेवायला आवडतं. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो क्वचितच दिसतो. पण, अलिकडेच तो एका कार्यक्रमात पोहचला होता. यावेळी फहादच्या फोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फहाद हा 'मॉलीवूड टाईम्स' या चित्रपटाच्या पूजा समारंभात पोहोचला. हा चित्रपट अभिनव सुंदर नायक दिग्दर्शित करत आहेत आणि नसलीन त्यात मुख्य भूमिकेत आहे. या कार्यक्रमात फहादच्या हातात दिसणाऱ्या फोननं सर्वांचं लक्ष वेधलं. तो फोन जुन्या पद्धतीचा कीपॅड मोबाईल आहे. तो फोन पाहिल्यानंतर असं वाटतं की तो एक स्वस्त फोन असावा. पण, तसे नाही. खरंतर, हा फोन यूकेच्या लक्झरी ब्रँड व्हर्टूचा अॅसेंट रेट्रो क्लासिक मॉडेल (Vertu Ascent Retro Classic Keypad Phone) आहे. त्याची किंमत सुमारे ११,९२० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १०.२ लाख रुपये आहे.
सध्या हा फोन अधिकृत साईटवरून स्टॉकआउट झाला आहे. म्हणजेच फहादने तो खूप पूर्वी खरेदी केला असावा. हे एक लिमिडेट आणि खास मॉडेल आहे. व्हर्टू ब्रँडचे फोन सामान्य मोबाईलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे फोन हाताने बनवलेले आहेत आणि त्यात लेदर, टायटॅनियम आणि नीलम काच सारख्या महागड्या वस्तूंचा वापर केला जातो. हे फोन जुने दिसू शकतात, परंतु त्यांची शैली आणि एक्सक्लुझिव्हिटी त्यांना खास बनवते. काही व्हर्टू फोनमध्ये पर्सनल असिस्टंटसारख्या सेवा देखील असतात.
फहाद फासिलच्या कामाच्या बाबतीत बोलायाचं झालं तर तो 'द इडियट ऑफ इस्तांबुल' (The Idiot of Istanbul) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा इम्तियाज अली यांचा चित्रपट आहे. फहादचे वडील हे दक्षिणेतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. फहाद याने २००२ मध्ये चित्रपट कैयेथुम दोराथपासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने मध्येच ब्रेक घेतला आणि २००९ मध्ये केरळ कॅफेमधून कमबॅक केलं होतं.