'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनला (Allu Arjun) आज तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणीच अल्लू अर्जुनलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला आधी नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली. आता 'पुष्पा'ला दिलासा मिळाला आहे. तेलंगणा हायकोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे आता 'पुष्पा' च्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
हा निर्णय देताना न्यायाधीश म्हणाले, "कुटुंबाप्रती आम्हाला सहानुभूती आहे. पण अल्लू अर्जुन एक अभिनेता आहे. त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. नागरिक म्हणून त्यालाही जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. केवळ एक अभिनेता म्हणून त्याच्यासोबत असं करता येणार नाही.". तसंच अल्लू अर्जुनच्या वकिलाने युक्तिवाद करताना सांगितले की, 'अल्लू अर्जुन तिथे आल्याने कोणाचा जीव गेला असं पोलिसांच्या निदर्शनात आलं नव्हतं. साधारणपणे कलाकार आपल्या सिनेमाच्या रिलीजआधी प्रीमिअरला हजेरी लावतातच.' हे सांगताना वकिलाने शाहरुख खानच्या विरोधात गुजरात हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केसचा रेफरन्स दिला.\
तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, 'अल्लू एक अभिनेता असला तरी आता तो एक आरोपी आहे. त्याच्याच उपस्थितीमुळे थिएटरबाहेर इतकी गर्दी जमली आणि ही दुर्घटना घडली.'
हायकोर्टाने जामीन मंजूर करताच अल्लू अर्जुन भावुक झालेला दिसला. आज सकाळीच पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याची पत्नी चिंतेती दिसली. याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मला ना धड नाश्ता करु दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला अशी तक्रार अल्लू अर्जुनने केली होती. दिवसभरात पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढल्यानंतर अखेर त्याला दिलासा मिळाला आहे.