Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील KIMS रुग्णालयात सकाळीच पोहोचला 'पुष्पा', जखमी मुलाच्या वडिलांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:01 IST

अल्लू अर्जुनला पुन्हा पोलिसांकडून मिळालेली चेतावनी

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे सिनेमाला यश मिळत असताना अल्लू अर्जुन मात्र पहिल्या दिवसापासूनच अडचणीत सापडला आहे. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २'च्या प्रीमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षीय मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणात अल्लू अर्जुनलाही अटक झाली होती. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान अल्लू अर्जुनने आता नुकतीच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

संध्या थिएटर चेंगराचेंगरी घटनेतील ९ वर्षीय मुलगा श्री तेजा सध्या तेलंगणातील KIMS रुग्णालयात दाखल आहे. त्याचा ब्रेन डॅमेज झाल्याची अपडेट डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. सध्या हा चिमुकला मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान या प्रकरणार अल्लू अर्जुनवरही केस सुरु असल्याने त्याला याआधी श्रीतेजाच्या वडिलांची भेट घेण्याची परवानगी नव्हती. सध्या तो जामिनावर असून नुकतीच त्याला कोर्टाकडून परवानगी मिळाली. म्हणून आज सकाळीच अल्लू अर्जुन KIMS रुग्णालयात आला होता. त्याने श्रीतेजाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच डॉक्टरांशी बोलला आणि त्याच्या वडिलांची भेटही घेतली. लागेल ती मदत करण्याचं आश्वासन त्याने दिलं. अल्लूचा रुग्णालयात जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अल्लू अर्जुनला त्या घटनेनंतर १ महिन्यांनी चिमुकल्याची भेट घेता आली आहे. जवळपास अर्धा तास तो रुग्णालयातच होता. त्याच्यासोबत तेलंगणा राज्य फिल्म विकास निगमचे अध्यक्ष दिल राजू देखील होते.  पोलिसांनी अल्लूला त्याची ही भेट गोपनीय ठेवण्यास सांगितलं होतं जेणेकरुन हॉस्पिटल परिसरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. तसंच त्याने जर सहकार्य केलं नाही तर जो काही नकारात्मक परिणाम होईल त्याची जबाबदारी अल्लूचीच असेल असे सांगण्यात आले होते. 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodहॉस्पिटलतेलंगणा