Allu Arjun Arrest : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर) पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनीअल्लू अर्जुनला अटक केली होती. त्यानंतर अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. संपूर्ण रात्र तुरुंगात काढल्यानंतर आज सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली.
पण, अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अल्लू अर्जुनने गंभीर आरोप केले होते. "पोलिसांनी मला ना धड नाश्ता करू दिला ना कपडे बदलण्याचा वेळ दिला. एखाद्याला अटक करण्यासाठी बेडरूममध्ये येणे, पोलिसांचे हे जरा अतिच झाले", असं अल्लू अर्जुन म्हणाला. त्याच्या या आरोपांवर आता हैदराबाद पोलिसांनी स्पष्टिकरण दिलं आहे.
"जेव्हा पोलीस त्यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांनी कपडे बदलण्यासाठी काही वेळ मागितला होता. ते त्यांच्या बेडरुममध्ये गेले. पोलीस बाहेर त्यांची वाट पाहत होते. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कोणत्याही पोलिसाने त्यांच्याबरोबर गैरवर्तणूक केली नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर बोलण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर ते स्वत:च बाहेर आले आणि पोलिसांच्या गाडीत बसले", असं हैदराबाद पोलिसांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुनची साऊथमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यातच त्याच्या 'पुष्पा' सिनेमाचा भलामोठा चाहतावर्ग आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. ५ डिसेंबरला 'पुष्पा २' रिलीज झाला. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. यावेळी एक दुर्घटना घडली. दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुलं श्रीतेज (९) आणि संविका (७) यांच्यासोबत 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला उपस्थित होती. प्रिमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झालं. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं.