अमिताभ बच्चन यांचा सतत टीव्हीवर लागणारा 'सूर्यवंशम' सिनेमा माहितच असेल. या सिनेमात साउथ अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) मुख्य भूमिकेत होती. सौंदर्याचा २००४ साली विमान अपघातात मृत्यू झाला होता. आता २१ वर्षांनंतर तिचा अपघात नाही तर ही हत्या असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तेलंगणाच्या खम्मम येथे एका सामाजिक कार्यकर्त्याने अभिनेते, निर्माते मोहन बाबू यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. तसंच त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणावर आता सौंदर्याचे पती रघु यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री सौंदर्याचे पती रघु जी.एस. यांनी तेलुगु ३६० शी बोलताना सांगितले की, "श्री मोहन बाबू सरांनी माझी दिवंगत पत्नी सौंदर्याकडून अवैध पद्धतीने कोणतीही संपत्ती मागितली नव्हती. जितकं मला माहित आहे आमचं मोहन बाबूंशी काहीही देणंघेणं नव्हतं. आम्ही त्यांना २५ वर्षांपासून ओळखतो. पण आमच्यात प्रॉपर्टीसंबंधी काहीच नव्हतं. मी मोहन बाबू यांचा सम्मान करतो आणि तुम्हा सर्वांसोबत हे सत्य सांगू इच्छितो. आमचे मोहन बाबू यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते आणि आम्ही एका कुटुंबाप्रमाणेच होतो. मी पुन्हा स्पष्ट करु इच्छितो की आमच्यात संपत्तीविषयी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यामुळे कृपया चुकीच्या गोष्टी पसरवू नका."
तक्रारदाराने काय म्हटलं?
तक्रारदारच्या सांगण्यानुसार, मोहन बाबू बळजबरी सौंदर्याच्या एका जमिनीवर कब्जा मिळवायचा प्रयत्न करत होते. सौंदर्या आणि त्यांचे भाऊ अमरनाथ यांच्यावर शमशाबाद येथील जलापल्लीमधील सहा एकर जमीन आणि एक गेस्टहाऊस विकण्यासाठी दबाव टाकला जात होता. सौंदर्याच्या भावाने ही जमीन विकण्यास नकार दिला होता. यानंतरच सौंदर्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे सगळं नियोजित होतं. मला मोहन बाबूंपासून धोका आहे. त्यासाठी मला सुरक्षा पुरवा.